अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसीतील आयटी पार्कचे शहर काँग्रेसने पोलखोल करणारे फोटो व मजकूर व्हायरल केला होता. त्यानंतर काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंवर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर किरण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले होते. आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेत किरण काळे अदखलपात्र असल्याचे सांगितले होते. Kiran Kale's MLA told Jagtapan: Fear is not in my blood
हे प्रकरण शांत होत नाही तोच आमदार संग्राम जगताप यांनी काळे यांना 1 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे नवीनच राजकीयवादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात किरण काळे यांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत आमदार जगताप यांना पुन्हा लक्ष्य केले. तसेच काळेंनी आमदार जगतापांच्या नोटिसीला ईमेल द्वारे आठ पानी उत्तर दिले.
पत्रकार परिषदेला शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, निजाम जहागीरदार, विशाल घोलप, इम्रान बागवान, सुजीत जगताप, गणेश आपरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, योगेश जयस्वाल आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत किरण काळे म्हणाले, आमदार जगताप मला जाहीरपणे अदखलपात्र म्हणाले होते. खासगीत मात्र त्यांनी माझी गंभीर दखल घेतली आहे. ॲड. किशोर देशपांडे यांच्या मार्फत जगताप यांनी मी आयटी पार्क प्रकरणावरून केलेले आरोप आपली बदनामी करण्याच्या हेतूने केले असल्याचे म्हणत 10 दिवसांच्या आत 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 या खात्यात भरून त्याची पावती त्यांना पाठवण्याची नोटीस पाठवली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे.
ती नोटीस मला नोटीस प्राप्त झाली आहे. त्याला मी कायदेशीररित्या लेखी उत्तर दिले आहे. एखाद्या गोष्टीतील सत्य मांडणे म्हणजे एखाद्याची बदनामी करणे असे म्हणणे चुकीचे आहे. तथाकथित आयटी पार्कची काँग्रेसच्या पथकाने स्वतः पाहणी केली असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध आहे. ते नगरकरांसमोर आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखविले आहे.
यामुळे माझे विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ते माझ्यावर एका मागे एक गुन्हे दाखल करणे, खटले दाखल करणे याचा सपाटाच लावत आहेत. 'कर नाही तर डर कशाला'. त्यामुळे मी त्याची पर्वा करत नाही. माझ्या अंगावर आलेल्यांना नगरकरांच्या हितासाठी शिंगावर घेत चारीमुंड्या कसे चीत करायचे हे मला माहित आहे. घाबरणे हे माझ्या रक्तात नसून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अपप्रवृत्तींच्या विरोधात लढत राहणे हे मला माहीत आहे.
लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी दावा केल्याप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या सह उभारलेला तथाकथित आयटी पार्क नगरकरांना दाखवावा. त्यांनी कागदपत्र, पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे. मी देखील पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवायला तयार आहे. खोटे बोलणे माझ्या रक्तात नाही. मी खोटं बोललो असेल तर त्यांची विशाल गणपतीसमोर माफी मागेन. पण ते नगरकरांशी खोटे बोलले असतील हे मी पुन्हा एकदा सिद्ध केले तर जाहीरपणे माफी मागण्याची त्यांची तयारी आहे का ? असा सवाल काळे यांनी केला आहे.
झोपेत सुद्धा त्यांना माझाच चेहरा दिसतो
काळे पुढे म्हणाले की, त्यांना झोपेत सुद्धा आजकाल माझाच चेहरा दिसतो. माझ्या सारख्या सामान्य तरुणाचा एवढा धसका त्यांनी घेणे बरे नाही. मला एका बाजूला अदखलपात्र म्हणतात आणि अंधारामध्ये मात्र 1 कोटी रुपयांची दखल घेतात. काँग्रेस आणि नगरकरांना नगर शहरामध्ये पडलेल्या हजारो खड्ड्यांमधून मार्ग कसा काढायचा याची भ्रांत पडली आहे. यांना मात्र किरण काळेचा आवाज कसा दडपता येईल याची भ्रांत पडली आहे. माझी 1 कोटीची दखल घेणाऱ्या ज्या आमदारांना शहरात पडलेल्या 1 लाख खड्ड्यांची दखल घेता येत नाही. नगरकरांना खड्ड्यात ढकलणाऱ्या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना नगरकरंच पुढील विधानसभा निवडणुकीत बेदखल करतील. नोटीस उत्तराचा 15 हजार रुपये खर्च काळे यांनी जगताप यांच्यावर ठेवला असून सदर रक्कम आपल्या रोख स्वरुपात न देता आमदारांच्या आयुर्वेद कार्यालय जवळ असणार्या असंख्य खड्ड्यांपैकी काही खड्डे शास्त्रशुद्ध पद्धतीने बुजवावेत असा सल्ला काळेंनी दिला आहे.
नोटिसीच्या उत्तरात या घटनांचा केला उल्लेख
नोटिसीला प्रत्युत्तर देताना काळे यांनी अनेक महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. केडगाव हत्याकांड प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेल्या घटनेमुळे नगर शहराची बदनामी झाली. जशी माझी दखल घेतली तशी केडगाव हत्याकांडामधील फरार असणाऱ्या एका महिला आरोपीच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा करण्याची दखल शहराचे लोकप्रतिनिधी घेणार काय असा खोचक सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.