Kolhapur Abortion Racket AI
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Abortion Racket: निवृत्त सरकारी डॉक्टरने गर्भातच खुडल्या 300 कळ्या! आरोग्य अन् वैद्यकीय मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रॅकेटचा पर्दाफाश

Kolhapur Abortion Racket DR. Chandrakant Gaikwad News: करवीर पोलिसांची मोठी कारवाई. कोल्हापुरातील कथित गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; निवृत्त सरकारी डॉक्टर डॉ. चंद्रकांत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू.

Rahul Gadkar

Kolhapur News: आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉक्टर अधिकाऱ्याला जवळपास लाख रुपये निवृत्ती वेतन असूनही तो गर्भपात करणाऱ्या रॅकेटमध्ये प्रमुख भूमिकेत असल्याची माहिती कोल्हापुरातील करवीर पोलिसांना मिळाली होती. सरकारी निवृत्ती वेतन मिळत असूनही उच्चशिक्षित असलेल्या डॉक्टर अधिकाऱ्यांकडून ज्यादा कमाईसाठी आतापर्यंत जवळपास 300 गर्भपात केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे.

पोलिसांनी त्याच्या हॉस्पिटलवर छापा टाकत डॉ. चंद्रकांत गायकवाड याला ताब्यात घेतले. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गर्भपातासाठी त्याने २० ते २५ हजार रुपये घेतल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

आठवडाभरापूर्वी करवीर पोलिसांनी कळंबा येथील थ्री स्टार लॉजवर छापा टाकून दोन दिवसांपूर्वी महिला एजंटांना अटक केली होती. यातील एका एजंटच्या चौकशीत तिने गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपातासाठी कदमवाडी रोडवरील डॉ. चंद्रकांत गायकवाडकडे पाठविल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी या हॉस्पिटलमध्ये सापळा रचला होता.

करवीर पोलिसांनी एका डमी महिलेला गर्भपाताच्या नावाखाली प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. डॉ. गायकवाडने केसपेपर न बनविता तिची पोर्टेबल मशीनने तपासणी केली. यानंतर तिला गर्भपाताची गोळी दिली होती. तिचा गर्भपात करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली. याचवेळी या महिलेने इशारा करताच पोलिसांनी छापा टाकून डॉ. गायकवाडला ताब्यात घेतले. बंगल्यात गर्भपातासाठी जमवलेले सोनोग्राफी मशीन, गोळ्या, शस्त्रक्रियेची उपकरणे पोलिसांनी जप्त केली.

डॉक्टर की कसाई....

दोन वर्षांतच गायकवाडने जवळपास ३०० गर्भपात केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्या कार्यरत असून त्या सर्वांशी गायकवाडची ओळख असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी डॉ. गायकवाडचा रक्तदाब व रक्तातील साखर वाढली. त्रास होऊ लागल्याने त्याला सीपीआरमध्ये तपासणीला आणण्यात आले. तपासणीनंतर त्याला तेथे दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यामुळे त्याची अटक तूर्त टळली आहे.

कोल्हापुरातून सेवेला सुरुवात

डॉ. गायकवाडने सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावली. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीडमध्ये कर्तव्य बजावले. सेंट जार्ज हॉस्पिटलचा अतिरिक्त अधीक्षक तर पुणे आरोग्य विभागातून सहायक संचालक पदावरून तो सेवानिवृत्त झाला होता.

डॉ. गायकवाड वादग्रस्तच..

डॉ. गायकवाड १९८३ ते १९९५ या कालावधीत वैद्यकीय अधीक्षक पदावर कोल्हापुरातील गांधीनगर, हातकणंगले व सोळांकूरमध्ये कार्यरत होता. त्याकाळातही त्याच्याजवळ पोर्टेबल सोनोग्राफी मशीन अनेकांनी पाहिले आहे. याचा वापर त्याने कशासाठी केला, याची चौकशी होणे बाकी आहे. मुंबईत कार्यरत असताना त्याच्यावर लाचखोरीचे आरोप होऊन काही काळ निलंबित होता, अशी माहिती समोर येत आहे.

आरोग्य व वैद्यकीय मंत्र्यांच्या जिल्ह्यातच गर्भपाताचा सुळसुळाट

कोल्हापूर जिल्ह्याला वैद्यकीय हब बनवण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. एकीकडे आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सकारात्मक चित्र निर्माण होत असताना दुसरीकडे गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा जिल्ह्यात सुळसुळाट होत असताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी कळंबा येथे लॉजवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच निवृत्त सरकारी डॉक्टर अधिकाऱ्यांकडूनच गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT