Chandrashekhar Bawankule sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP News : भाजपमध्ये पदाधिकारी निवडीवरून वादाची ठिणगी; कोल्हापुरात बावनकुळे पॅचअपसाठी येणार...

Mangesh Mahale

-राहुल गडकर

Kolhapur : पदाधिकारी निवडीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पक्षांतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर येत आहे. गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील पदाधिकारी निवडीवरून जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सात ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या थांबवणे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

भाजपच्या पदाधिकारी निवडीवरून आजरा तालुक्यात वादाची ठिणगी पडली आहे. जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी नव्या निवडीबाबत संताप व्यक्त करीत जिल्हा पातळीवरील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आजरा भाजपमध्ये अनेक वर्षांपासून धुसफूस सुरू होती. नव्या निवडीच्या निमित्ताने ती सर्वांसमोर आली आहे.

वरिष्ठ नेतेमंडळींकडून आमची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोपही तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यातूनच पक्षाचे कार्यालय बंद करून नामफलकही काढून ठेवण्यात आलेला आहे. त्यापाठोपाठ गडहिंग्लज भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. जोपर्यंत नव्या नियुक्त्या रद्द होत नाहीत, तोपर्यंत भाजपचे काम बंद, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या संपूर्ण परिस्थितीला पदाधिकारी निवड कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये गडहिंग्लज आणि आजरा या दोन तालुक्यांमधील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. एकीकडे कोल्हापूरमध्ये भाजपने ताकद पणाला लावली आहे. दोन्ही लोकसभा जागांसह चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

बावनकुळे यांचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे जुन्या कार्यकर्त्यांकडून पाठ फिरवली. त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूर दौऱ्यात ही नाराजी त्यांच्यासमोर प्रकट होऊ नये, यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात आहेत.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT