CM Shinde On Maratha Aarakshan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही; जरांगेंची सरकारला काळजी...

Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अचानक दौऱ्याने मात्र कोल्हापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur : अतिशय गुप्तता पाळून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात मध्यरात्रीपर्यंत ठिय्या मांडला होता. रात्री आठ वाजता ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कणेरी मठ येथील सिद्धगिरी केंद्रातील सिर्वाचल पशुसंवर्धन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर तब्बल 8 तास ते कोल्हापुरात होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास ते पुन्हा मुंबईला गेले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अचानक दौऱ्याने मात्र कोल्हापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठा समाजाने सरकारला समजून घ्यावे..

हे सरकार मराठा समाजाला न्याय देणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वांनी धैर्य व धीर ठेवावा. मराठा समाजाने सरकारला समजून घ्यावे,तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जरांगे पाटलांची राज्य सरकारला काळजी

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या त्या दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा समाज मागास आहे. असे सांगत शिंदे म्हणाले, कुणबी दाखले देण्याबाबत नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समिती ही अत्यंत चांगलं काम करत आहे. आतापर्यंत आठ ते दहा हजार जुन्या नोंदी शोधल्या आहेत. अगदी हैदराबाद मध्ये जाऊनही नोंदी तपासल्या जात आहेत. या सर्व कामाला काही अवधी लागणार आहे. यामुळे मराठा समाजाने धैर्य ठेवावे. आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये,असे आवाहन त्यांनी केले.

सरकार सकारात्मक असताना आंदोलन का?

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार जर नकारात्मक असते तर आंदोलन होते. मराठा आरक्षण प्रश्न हे सरकार सकारात्मक आहे. आम्ही ते कृतीतून दाखवून देत आहोत, असे सांगत शिंदे म्हणाले, मराठा समाजाच्या तरुणांच्या नोकरीसाठी 3800 अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा धाडसी निर्णय करून त्यांना नेमणुका दिल्या. सरकार सकारात्मक असताना आंदोलन करावे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT