Kolhapur News, 26 Jul : कसबा बावड्यातील न झालेले ड्रेनेज पाईपलाईनचे काम झाले असे दाखवून 85 लाखांचे बिल अदा करण्याचा घोटाळा माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी उघडकीस आणला. तो आता संबंधित कामाचे ठेकेदार श्रीपाद वराळे यांनी केलेला गुन्हा कबूल केल्यामुळे आता अधिकारी देखील रडारावर आले आहेत.
झालेले काम व अॅडव्हान्स म्हणून बिल घेतले आहे. ते मिळवण्यासाठी महापालिकेतील कनिष्ठांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतची ठरलेली टक्केवारी दिली आहे. मी घोटाळा केलेला नसून दुसऱ्या ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी माझा बळी दिला जात आहे. मी चौकशीला तयार असून, सर्व अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी, असे मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ठेकेदार वराळे यांनी महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
तसंच पैसे दिलेले स्क्रीनशॉट देखील माध्यमांमध्ये व्हायरल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा आणि आरोप ठेकेदार श्रीपाद वराळे यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षातील कोल्हापुरातील ज्या पद्धतीने कोल्हापूरचा विकास व्हायला हवा, त्या उलट कोल्हापूरची दैना काही अधिकाऱ्यांच्या मानसिकतेने झाल्याचे दिसून येते. एखादे विकास काम आल्यास त्यात टक्केवारी मिळवायची.
टक्केवारी मिळवण्यासाठी राजकीय लोकप्रतिनिधींना हाताशी धरायचं. याच प्रतिनिधींच्या माध्यमातून महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्याचे पद घशात घालून घ्यायचे. त्यातून टक्केवारी मिळवण्याचा गोरख धंदा काही अधिकाऱ्यांनी लावल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात कायमच असते.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या प्रमुख पदावर दबा धरून बसलेला अधिकारी या प्रकरणानंतर रडारावर आला आहे. तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे मागील दोन महिन्यात सेवानिवृत्त झालेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडल्याचा आरोप सत्यजित उर्फ नाना कदम यांच्याकडून करण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर बसण्यासाठी अनेक अधिकार्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र राजकीय आश्रय घेऊन नेत्रदीप सरनोबत तब्बल दहा वर्ष या पदावर असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरीच्या काळात राजकीय आश्रय घेऊन अनेकांनी सरनोबत यांचा थेट गेम केला. युतीचे सरकार असताना विरोधातील नेत्यांना पालिकेतील अंतर्गत माहिती पोहोचवतात. अशी टिप्पणी एका नेत्याला मिळाल्यानंतर सरनोबत यांची गंच्छती जल अभियंता पदावर करण्यात आली.
त्या ठिकाणी जल अभियंता हर्षजीत घाटगे शहर अभियंता करण्यात आलं. तर त्यानंतर ही राजकारण झालं. महापालिकेत 100 कोटींची कामे घाटगे यांची बदलीमागे राजकीय किनार असल्याचे देखील सांगितले जाते. महानगरपालिकेतील प्रत्येक मोठा अधिकारी राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधीचा हस्तक म्हणून काम करत असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात व नगरसेवकांच्या देखील चर्चा असते.
अशात पंधरा दिवसांपूर्वी शहर अभियंता पद दीपक म्हस्कर यांना देण्यात आले. त्यामागे राजकीय व्यक्तींचाच हात असल्याचे सांगितले जाते. माजी खासदार आणि माजी नगरसेवकांमार्फत फील्डिंग लावून ते या पदावर आल्याचे सांगितले जाते. एकंदरीतच काही राजकीय लोकप्रतिनिधी काही अधिकारी 'दोघे मिळून खाऊ कोल्हापूरची वाट लावू' अशीच भूमिका घेऊन काम करतात का? असा सवाल आता कोल्हापूरकरांना पडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रमुख पदावर असणारा हा तत्कालीन अधिकाऱ्याची संपत्ती डोळे दिपवणारी आहे. बांधकाम व्यवसायिक ठेकेदार यांच्याशी साटेलोटे करत एक दोन टक्के कमिशन घेणारे अधिकारी दहा वर्षात मालामाल झालेत. त्यांच्याकडे अमाप संपत्ती जमा झाली आहे.
शहरात एखादा प्रमुख प्रोजेक्ट आला तर हमखास त्यात एक फ्लॅट, असे समीकरण घेऊन तत्कालीन अधिकारी मंजुरी देत असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. दिसायला साधा भोळा, लढतरी सोळा असाच कार्यकाळ या अधिकाऱ्यांचा राहिला आहे. त्याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.