Kolhapur Gokul Milk Union Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk Election : 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीची तारीख जवळ; 2700 ची मॅजिक फिगर अन् 130 ठरावांची लागणार ताकद

Kolhapur Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाकडे 5400 सभासद असून 25 संचालक निवडून द्यायचे आहेत. यंदाची निवडणूक ही आणखीच गाजण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय केंद्र म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. यापूर्वी जिल्ह्यातील नगरपालिका, कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आता नेत्यांना गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 15 दिवसांत जाहीर होण्याचा अंदाज आहे.

प्रशासकीय पातळीवर आणि नेत्यांच्या गाठीभेटीतून गोकुळच्या जोडण्यांना वेग आला आहे. गोकुळ दूध संघाकडे 5400 सभासद असून 25 संचालक निवडून द्यायचे आहेत. यंदाची निवडणूक ही आणखी गाजण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली देखील नेत्यांच्या पातळीवर सुरू असल्याचे बोलले जाते.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोकुळवर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे महाडिक गटाची 25 वर्षांची सत्ता खालसा झाली. मात्र मागील 5 वर्षात सर्वच राजकीय समीकरण बदलले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील आता एकटे पडले असल्याने गोकुळच्या निवडणुकीला चांगलीच धार येणार आहे.

या 5 वर्षात महाडिक गटासोबत असणारे संचालक हे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासोबत गेले आहेत. तर सतेज पाटील यांच्यासोबत असणारे संचालक महायुतीतील घटक पक्षात आहेत. त्यामुळे गोकुळची निवडणुकी यंदा चांगलीच गाजणार आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची धडपड चालू आहे.

मागील निवडणुकीत गोकुळकडे जवळपास 3900 सभासद नोंदणी होती. मात्र पाच वर्षात या सभासद नोंदणीमध्ये वाढ केली असून ती संख्या आता 5400 इतकी सभासद संख्या आहे. एकीकडे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.

दुसऱ्या बाजूला गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असली तरी निवडणूक लागल्यास दोन्ही पॅनेलला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 2700 मतांची गरज आहे. सध्या नव्या नियमानुसार गोकुळ दूध संघावर 25 संचालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संचालकाकडे कमीत कमी 130 ठरावधारक असतील तरच तो उमेदवार म्हणून एखाद्या पॅनलमधून उभा राहू शकतो.

गोकुळ दूध संघामध्ये सध्या अनुभवी आणि मुरलेले संचालक म्हणून शौमिका महाडिक, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, चेतन नरके, अजित नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अंबरीश घाटगे, शशिकांत चुयेकर, रणजित पाटील, ए. वाय पाटील यांच्याकडे सर्वाधिक ठराव आहेत. प्रत्येकी 200 पेक्षा जास्त अधिक ठराव याच मंडळीकडे आहेत.

शिवाय माजी आमदार महादेवराव महाडिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण गोकुळमध्ये सत्तेवर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ज्या पॅनेल कडे मॅजिक फिगर गाठण्याचा आणि ज्या संचालक उमेदवाराकडे 130 पेक्षा अधिक ठराव आहेत. तोच या सर्व पॅनेलला विजयापर्यंत नेऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT