Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सध्या महापुराच्या धास्तीने भयभीत आहे. कोल्हापूर शहरासह परिसरात पंचगंगा नदीच्या पाण्याने वेढा घालून आपलं रौद्ररूप धारण केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
पण अशा परिस्थितीत कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला पुढील आमदारकी मिळावी यासाठी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीमातेला साकडं घालण्यात व्यस्त आहेत. एकीकडे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आणि माजी पालकमंत्री या नात्याने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे 'फिल्ड'वर उतरल्याचे दिसतात. तर दुसरीकडे पालकमंत्री यांनी 'ऑनलाईन' बैठक घेत प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून नागरी वस्तीत प्रवेश करत आहे. महापुराचे गंभीर संकट कोल्हापूर शहरासह परिसरावर आहे. पण अशा परिस्थितीत पालकमंत्री या नात्याने या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात असणे आवश्यक आहे.
मात्र, 500 कार्यकर्त्यांसह पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Muushrif) थेट तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. इतकेच नव्हे तर सहाव्या टर्मला देखील आमदार व्हावे याचं साकडे देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घातले आहे.
आई तुळजाभवानी माते! गोरगरिबांचा श्रावणबाळ नामदार हसन मुश्रीफ यांना सहाव्यांदा आमदार कर.. असे साकडे कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीला घातली आहे. गोकुळ दूध संघाचे युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 500 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापुरात जाऊन देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी तुळजापुरात आई तुळजाभवानी मातेचे मनोभावे दुपारी एक वाजता दर्शन घेतले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी ऑनलाईन बैठक घेतली. सन 2019 आणि 2021 साली आलेल्या पुरस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करुन निवारागृहात स्थलांतरीत केलेल्या व्यक्ती आणि जनावरांना आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी विसर्ग अलमट्टीतून व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हयात ज्या ठिकाणी 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तातडीने पंचनामे करा. सर्व तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात आल्यानंतर पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.