Kolhapur News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkangale Tahsil: प्रस्थापितांना संधी; महाविकास आघाडीवर उमेदवार शोधण्याची वेळ

kolhapur local body election 2025 Reservation News: शिंदे सेना आणि महाविकास आघाडीमध्येच बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे, तर स्थानिक गटांचेही वर्चस्व राहणार आहे. पाच वर्षांत विकासकामांच्या बाबतीत हातकणंगले मागे पडले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी इच्छुकांनी निःश्वास सोडला. तर काही ठिकाणी अनेकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायत, हुपरी नगरपरिषद आणि पेठवडगाव मध्ये प्रस्थापितांना अच्छेदिन आले आहेत. तर काहींनी राजकीय सोयीस्कर भूमिका घेतलेल्या अनेकांचे नशीब उजळले आहे. मात्र महाविकास आघाडीला काही ठिकाणी उमेदवार शोधण्याचे वेळ येणार आहे.

आघाडीकडून उमेदवारांची शोधाशोध

हुपरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले आहे. मागील चक्राकार आरक्षण विचारात न घेता नव्याने आरक्षण प्रक्रिया लागू करण्याच्या राज्य सरकाराच्या नवीन धोरणामुळे येथे नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण वर्ग (खुले) आरक्षण पडेल, अशी अनेकांना आशा होती. आरक्षणाने संधी हुकल्यास ओबीसीतून लढण्यासाठी काहींनी तयारी ठेवली होती. मात्र अनेकांचा भ्रम निरास झाला आहे.

महायुतीकडून रिपब्लिकनचे (आठवले) मंगलराव माळगे, आवाडे समर्थक किरण कांबळे, बाळासाहेब खैरे यासह जयकुमार माळगे विरोधात धर्मवीर कांबळे, आनंदराव कांबळे आदींच्या नावांची चर्चा आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीकडे तुल्यबळ उमेदवारांच्या नावांची यादी अधिक आहे. महायुती विरोधात लढण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महाविकास आघाडी आणि मनसे, स्वाभिमानी संघटना व इतरांना एकत्रित यावे लागेल. त्यांना नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे.

हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या इच्छुकांनी कंबर कसली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. तब्बल १३ ते १४ जणांची नावे चर्चेत असल्याने बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. हातकणंगलेची नगरपंचायत झाली आणि २०१९ ला पहिली लढत रंगली. त्यात शिवसेनेचे ७, भाजपचे ५, काँग्रेस १, राष्ट्रवादी १, तर ३ अपक्षांनी बाजी मारली होती. तसेच थेट नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे कै. अरुण जानवेकर यांची निवड झाली होती.

सध्या शहरात भाजप, शिंदे सेना आणि महाविकास आघाडीमध्येच बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे, तर स्थानिक गटांचेही वर्चस्व राहणार आहे. पाच वर्षांत विकासकामांच्या बाबतीत हातकणंगले मागे पडले आहे. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार विकासकामांना कितपत महत्त्व देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाणीटंचाई, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, शहरात एकमेव असलेली स्मशानभूमी, गावतलावात बेकायदेशीर केलेले बांधकाम, रेल्वे पुलाची दुरवस्था असे अनेक प्रश्न असून, यावर पर्याय कोण काढणार, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.

तिसऱ्या आघाडीची चर्चा

पेठवडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुला प्रवर्ग पडल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे. यापूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी होते. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.

वडगाव शहरात यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती महाआघाडी अशी संभाव्य लढत रंगणार आहे. भाजपच्या वतीने ही तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. यादव आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार विद्याताई पोळ या प्रबळ दावेदार आहेत. आरक्षण खुले झाल्यास यादव आघाडीतून एकमेव उमेदवार विद्याताई यांचे नाव पुढे येत होते. तर त्यांच्या विरोधात युवक क्रांती आघाडीतून प्रविता सालपे, माजी नगरसेवक रंगराव पाटील-बावडेकर असे दोन उमेदवार सध्या राजकीय चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT