Rajendra Patil Yadrawkar, Ganpatrao Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Nagarpalika Election : शिरोळमध्ये राजकीय भूकंप! यड्रावकरांनी गणपतराव पाटलांचा 'गडी' फोडला; नगराध्यक्ष उमेदवारीने समीकरणे बिघडली?

Kolhapur local body election Shirol politics : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिरोळमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यड्रावकरांनी गणपतराव पाटलांच्या गडावर गडी फोडला असून नगराध्यक्ष उमेदवारीने सर्व समीकरणे बदलली आहेत.

Rahul Gadkar

शिरोळ नगरपालिकांमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी काँग्रेस नेते गणपतराव पाटलांचा विश्वासू सहकारी फोडला आहे. राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि जनसंपर्क अधिकारी फोडत विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी श्वेता विश्वास काळे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत आता राजकीय चुरस रंगण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे काळे यांची उमेदवारी यड्रावकर यांनी जाहीर करताच पुन्हा शिरोळ नगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर अनेकांचे समीकरण बिघडल्याचे दिसून आले. त्यामुळे शिरोळ नगरपालिकेत पाटील आणि यादव गटाची प्राथमिक टप्प्यात आघाडी झाली असल्याचे सांगितले जाते.

शिरोळ नगर परिषदेमधील कारभारावरून आमदार यड्रावकर यांचे निकटवर्तीय आणि पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांची नाराजी असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.

अखेर या नाराजीला मूर्त रूप मिळाले असून, त्यांच्या पुतण्याला म्हणजेच पद्मसिंह पाटील यांना यादव आघाडीकडून उमेदवारी मिळाल्याने शिरोळच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. या घडामोडींमुळे प्रताप (बाबा) पाटील यांनी आमदार यड्रावकर यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि पृथ्वीराज यादव यांच्या यादव आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र बाबा पाटील यांची नाराजी लवकरच दूर करणार असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांपासून बाबा पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून,त्यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी होणार असून सर्वच आघाड्यांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे.

यड्रावकरांनी केलेल्या हालचालींनी विकास आघाडीला बळ मिळाले असले तरी,त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या नाराजीमुळे समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. बाबा पाटील यांनी यड्रावकरांविरोधात भूमिका घेतली तर शिरोळमधील पाटील समाजाच्या मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाबा पाटील यांची नाराजी दूर करण्यात यड्रावकर यशस्वी होतात का हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT