Kolhapur News, 12 Feb : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडलिक गटाचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांचे बंद घर फोडून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच दारात गुलाल उधळून फटाकेही फोडले. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली असून संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संतोष शिंदे यांच्याकडून निवडणूक काळात फेसबूक, व्हाट्सअपवर मुश्रीफ गटाच्या राजकारणाविरोधात लेख लिहले जात होते. मात्र तोच उमेदवार निवडून आल्यानंतर संतोष शिंदेंच्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञातांनी आत प्रवेश करत घरात व दारासमोर गुलालाची उधळण केल्याची घटना घडली.
सदर घटना घडली तेव्हा कुटुंबीय घरात नव्हते. शिंदे यांनी सांगितले की, “बोरवडे येथील मनोज फराकटे यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून गुलाल उधळला तसेच दारात फटाक्यांची आतषबाजी केली. सैन्य दलात असलेल्या भावाच्या घरातील बल्ब व काचा फोडण्यात आल्या. माझ्या आईला धक्काबुक्की करण्यात आली असून आता तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
शिंदे हे एस.टी. कर्मचारी शिवसेना युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस असून मंडलिक गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र पॅनल उभे केल्याने पक्षाकडून त्यांना प्रचारासाठी बेलवळे परिसरात जबाबदारी देण्यात आली होती. सोशल मीडियावर लेख प्रसारित केल्यामुळे विरोधकांकडून दोन वेळा धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीनंतर विरोधकांचे मताधिक्य घटल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित व्हिडिओ संशयास्पद असल्याचे सांगितले. “प्रकरणाची चौकशी सुरू असून वृद्ध महिलेचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. घटनेमागील सत्य समोर येईल,” असे त्यांनी सांगितले. रात्री पोलिसांनी शिंदे यांच्या आईकडे चौकशी केली आहे.
दरम्यान मनोज फराकटे यांनी आरोप फेटाळून लावले. “आमचे कार्यकर्ते व त्यांच्यात मोबाईलवरील संभाषणावरून शाब्दिक वाद झाला होता. त्या वादाला ते राजकीय रंग देत आहेत,” असे सांगितले. घटनेमुळे बेलवळे बुद्रुक व परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.