Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 'मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली, पण त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला'; मुश्रीफांचा रोख कुणाकडे?

Rahul Gadkar

Kolhapur News : कागल विधानसभा मतदारसंघातील लढत आता एकमेकांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे.

घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री पदासाठी नात्याचा सौदा केला, असा पलटवार केल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी देखील घाटगे यांच्यावर आता टीका केली आहे. इचलकरंजीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी घाटगे यांच्यावर निशाणा साधत कालच्या वक्तव्याचा बदला घेतला आहे.

माझ्याकडे जे खातं आलं त्या खात्याचा उपयोग मी जनतेसाठी केला. गरीब नागरिकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मोफत उपचार केले नाही तर तुरुंगात कसं टाकायचं मला माहिती आहे. त्यामुळे डॉक्टर माझं निमुटपणे ऐकतात. राज्यातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचा कायदा केला.जन्मापासून मृत्यूपर्यंतंच्या सगळ्या योजना घेतल्या असल्याचे मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी सांगितले.

त्या प्रवृत्तीला आपण ठेचलेच पाहिजे...

आगामी विधानसभा निवडणूक दोन विचारांची आहे. एका बाजूला मी गोरगरिबांची दिवसरात्र कामं करतो. दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकांना तुरुंगात घालून काम करणारी वृत्ती आपल्या तालुक्यात आहे. या प्रवृत्तीनं मला शरद पवारांना सोडण्याची वेळ आणली. त्या प्रवृत्तीला आपण ठेचलेच पाहिजे. मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. असा घणाघात मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचे नाव न घेता केला.

गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम त्यांनी केलं...

पहिल्या चार वर्षात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्याकडून काम करून घेतले. मात्र गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली त्यावेळी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्यावर दबाव आणून 4000 नागरिकांच्या पेन्शन बंद करायला लावल्या. गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम त्यांनी केलं. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक नेहमी म्हणायचे या सरंजामशाहीला सत्ता कशाला पाहिजे. त्यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे, असा टोला घाटगे यांना लगावत गेल्या 13 वेळा जे झालं नाही ते आता कसं होईल, तुम्ही काय काळजी करू नका, असेही मुश्रीफ म्हणाले.

...थेट छाताडावर बसायचं?

कुपेकर कुटुंबियांनी सांगावं गेल्या दोन निवडणुकीत त्यांच्या पाठीशी कोण होत. तुम्ही सगळे गावागावात काम करा, एक लाख मतापेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येणार.निवडणुकीत अशी कुस्ती मारायची की थेट छाताडावर बसायचं. त्यांनी हात जोडून म्हटलं पाहिजे की उठा आता मगच उठायचं, असा पलटवार मुश्रीफ यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT