Shivaji Maharaj Statue collapsed in malvan  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue: पुतळ्याचा बांधकाम सल्लागार पोलिसांच्या हातून निसटला कसा? पाठीशी कोण?

Rahul Gadkar

Kolhapur News:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी कोल्हापुरातील बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या पुतळ्याची सल्लागारपदाची जबाबदारी पाटील यांच्यावर होती.

स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून चेतन पाटील यांच्या घरी गेले असता पाटील हे फरार असल्याचे आढळले. गुन्हा दाखल झाल्यावर चेतन पाटील यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेणे अपेक्षीत होते, पण ते पोहचण्याआधीच डॉ. चेतन पाटील पसार झाल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या 'कारभारा'वर नाराजी व्यक्त केली आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्ण करण्याचे काम ठाण्यातील जयदीप आपटे या कारागीराला दिले होते. तर बांधकाम सल्लागार म्हणून कोल्हापूरचे डॉ. चेतन पाटील यांच्या माध्यमातून पुतळा चबुतराची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम देण्यात आले होते. पाटील हे कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहण्यास आहेत. सध्या ते एका स्वायत्त विद्यापीठातील सिव्हील इंजिनिअरींग शाखेत कार्यरत आहेत. त्यात ते स्ट्रक्चलर सल्लागार म्हणून काम पाहतात.

या पुतळ्याबाबत निविदा निघाल्यानंतर चबुतरा बांधकामाची निविदा डॉ. चेतन पाटील यांनी भरली होती. त्यानंतर हे काम त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. या संदर्भात डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पोलिस कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या माध्यमातून शिवाजी पेठ येथे चेतन पाटील यांच्या घरी पोहोचले. वेताळ तालमीच्या परिसरात डॉ. पाटील यांचे घर आहे. पोलिसांनी दुपारपर्यंत कुटुंबीयांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली. मात्र पाटील हे घरी नव्हते. पाटील हे कुटुंबासोबत घराला कुलूप लावून बाहेर पडले आहेत.

नौदल दिनी (४ डिसेंबर) २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या ३५ फुटांचा पुतळा सोमवारी दुपारी कोसळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT