जिल्हा परिषद निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या प्रभावामुळे भाजप आमदार नाराज झाले आहेत.
शिवाजीराव पाटील आणि विनय कोरे यांच्यासह काही आमदारांमध्ये असंतोष वाढला आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत या नाराजीचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
Kolhapur Gokul Row : राज्यात महायुतीची सत्ता असून जिल्ह्यातील सर्वच आमदार महायुतीचे घटक आहेत. पण महायुतीतील आमदारांना आपला पक्ष विस्तार करण्याचे अधिकार आहेत. केवळ एका तालुक्यापुरतेच मर्यादित न राहता जिल्हास्तरावर पक्ष विस्तार करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांवर आहे. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पन्हाळा, शाहूवाडी आणि चंदगड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले. त्यावरून तेथील स्थानिक आमदार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. महायुतीतील आमदारांच्या क्षेत्रात मंत्री मुश्रीफ यांनी दबदबा निर्माण केल्याने महायुतीतील जनसुराज्य आणि भाजप आमदारांच्या मनामध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या बद्दल असंतोष आहे. त्याचाच वचपा सध्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाच्या निमित्ताने काढण्याच्या तयारीत आहेत.
नगरपंचायत नगरपंचायत नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीतील घटक पक्षांनी तालुकास्तरावर परिस्थितीनुसार भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चंदगडमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप तर पन्हाळा शाहूवाडीमध्ये जनसुराज्य विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड पन्हाळा आणि शाहूवाडीमध्ये बाजी मारली. जनसुराज्य शक्तीच्या बालेकिल्ल्यात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर आमदार डॉ. विनय कोरे यांनी अध्यक्ष निवडीत आडकाठी आणली. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
दुसरीकडे चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून होत आला. भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी मुसंडी मारल्यानंतर गोकुळच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांना ब्रेक लावण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. गोकुळच्या अडून भाजपला संपवण्याचा डाव मंत्री मुश्रीफ यांचा आहे असा आरोप शिवाजीराव पाटील यांनी करत थेट मंत्री मुश्रीफ यांना गोकुळच्या निवडणुकीमध्ये शह देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या आमदार पाटील यांनीच गोकुळमध्ये मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याचे धाडस केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीतील अंतर चांगलेच वाढले आहे.
इतकेच नव्हे तर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र भाजपकडून मंत्री मुश्रीफ यांना पॅनलमध्ये न घेण्याच्या सूचना भाजप पक्षश्रेष्ठी समोर मांडले आहेत. याबाबतचा संशय मंत्री मुश्रीफ यांच्या जवळच्याच शिलेदारांनी व्यक्त केला. मागील पाच वर्षातील गोकुळचे राजकारण पहिल्याच महाडिक गटाला बाजूला करण्यासाठी मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी आपली बाजीपणाला लावली होती. त्याचा रोष ही महाडिक गटाला आहे.
मात्र महायुती म्हणून महाडिक यांनी आतापर्यंत थेट मंत्री मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला नाही. मात्र मागील पाच वर्षाचे राजकारण पाहिलेतर आमदार कोरे व आमदार पाटील यांची महाडिक गटांसोबत जवळीकता वाढली आहे. तर बाराशे सभासदांबाबत न्यायालयात धाव घेणाऱ्या महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांच्यामागे असणाऱ्या अदृश्य शक्तीचाही मनस्ताप मंत्री मुश्रीफ यांना आहे. मात्र आमदार कोरे आणि आमदार पाटील यांच्या असंतोष यामागे जिल्हा परिषदेचे राजकारण तर आहेच, शिवाय त्याच अदृश्य शक्तीचा हात देखील असल्याचे सांगितले जाते.
1. भाजप आमदार नाराज का आहेत?
हसन मुश्रीफ यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे नाराजी आहे.
2. कोणत्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे?
शिवाजीराव पाटील आणि विनय कोरे यांच्यासह काही आमदार नाराज आहेत.
3. हा वाद कोणत्या निवडणुकीशी संबंधित आहे?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीशी संबंधित आहे.
4. महायुतीमध्ये तणाव का निर्माण झाला आहे?
स्थानिक राजकारणात प्रभाव आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे.
5. पुढे काय होऊ शकते?
गोकुळ निवडणुकीत राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.