Kolhapur News: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महायुतीचे मंत्री आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यावर आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांनाच टार्गेट केले आहे.
जे शेतकरी बाधित होत नाहीत, अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासीयांची दिशाभूल करण्याचे काम पाटील करीत आहेत. विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला क्षीरसागर यांनी पाटील यांना परिपत्रक काढून दिला आहे.
इतकेच नव्हे तर सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांसाठी आणलेल्या थेट पाईपलाईनवर देखील टीका केली आहे. थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासीयांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या.त्यानंतर स्वत: आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासीयांच्या माथी मारली, याकडे लक्ष द्यावे, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.
"विरोधाला विरोध करण्याचे काम होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे असताना यासही राजकीय स्वार्थापोटी विरोध केला जात आहे. सध्या या माजी पालकमंत्री यांच्याकडे महायुतीला विरोध करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम शिल्लक नाही,"असा टोला त्यांनी लगावला.
शक्तीपीठ महामार्गाचे वेगळे वळण लावून शेतकरी बांधवांची आणि संपूर्ण जिल्हावासीयांची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. शक्तीपीठ महामार्ग हा महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असून जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच यावर आजही ठाम असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
आमदार सतेज पाटील यांच्याकडे मंत्री पद, पालकमंत्री पद होते. महापालिकेत त्यांची सत्ता होती पण त्यांनी शहरासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. सध्या लोकांना विकास हवा असून, त्यांची दिशाभूल करण्याचे करू नये. जे विरोधकांच्या व्यासपीठावर आहेत ते बाधित नाहीतच पण जे आमच्या बाजूने आहेत ते खरे बाधित शेतकरी आहेत ते शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आहेत. येत्या काळात शक्तीपीठ महामार्ग समर्थकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल, असेही त्यांनी याद्वारे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.