Hasan Mushrif News : कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरातच सत्ता स्थापन होईल, असा अंदाज सुरुवातीच्या टप्प्यात वाटत होता. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदावर दावा केला जात असल्याने सत्ता स्थापनेत विलंब लागला आहे. पदाधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या गुप्त बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेचा फॉर्मुला लक्षात घेतला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच बाजीगर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच पहिला अध्यक्ष होईल असा अंदाज आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेत महायुतीमध्ये ज्याच्या सर्वाधिक जागा त्याच्याकडे महापौर पद गेले आहे. हाच फॉर्मुला जिल्हा परिषद निवडणुकीत लागू करण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला जात आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री यांनी राजर्षी शाहू आघाडी म्हणजेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमचेच आहेत असा दावा केला. तर यड्रावकर हे शिवसेने सोबत दिसत आहेत. भाजपने जनसुराज्य आणि आपण एकच आत्मा असल्याचं जाहीर केल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर महायुतीतील या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.
मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होऊनही अद्याप पदाधिकारी निवडीचा मुहूर्त ठरत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे. आठवडाभरात निवड होईल, असा प्रारंभी अंदाज व्यक्त केला होता. पण, प्रत्यक्षात प्रक्रियेला विलंब होत असल्याचे दिसत आहे. निकालानंतर लगेचच सत्तासमीकरणांच्या हालचाली सुरू झाल्या. कोणत्या पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे, कोणाला अपक्षांचा पाठिंबा मिळणार, अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून गुप्त बैठका आणि चर्चाचे सत्र सुरू आहे.
मात्र,अधिकृतरीत्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर न झाल्याने अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात काम सुरू करण्याची उत्सुकता असताना पदाधिकारी निवडीच्या विलंबामुळे प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेत सुरुवातीला राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार यावर चर्चा सुरू असताना यामध्ये आता अध्यक्ष महायुतीचाच होणार असा सूर उमटत आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चढाओढ होणार आहे.
अध्यक्षपदाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतिम तोडगा निघालेला नाही. काही तालुक्यांना प्रतिनिधित्व द्यावे, महिला आरक्षणाचा विचार करावा, काही ठिकाणी वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेची प्रतीक्षा असल्याची चर्चा आहे. अपक्ष सदस्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. निवडणूक प्रक्रियेनंतर राजपत्रात सदस्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. त्यानंतर सभेची अधिसूचना काढणे, या प्रशासकीय टप्प्यांनाही काही प्रमाणात वेळ लागत आहे.
नऊ वर्षांनी पार पडलेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या कारभाराला गती मिळण्याची अपेक्षा असताना अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील विलंबामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. आता लवकरच निवडीची तारीख जाहीर होऊन सत्तासमीकरणांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.