Vivek Kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काळेंच्या जनता दरबारामुळे कोल्हे झाले नाराज

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी कोपरगावमध्ये काल ( मंगळवारी ) जनता दरबाराचे आयोजन केले होते.

मनोज जोशी

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे कोपरगावमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे शासकीय समस्या सुटाव्यात यासाठी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी कोपरगावमध्ये काल ( मंगळवारी ) जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( Snehalata Kolhe ) यांच्या गटातील पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केला आहे. ( Kolhe became angry because of the people court of Kale )

तक्रारींचे निरसन होत नसल्याचा आरोप करत विवेक कोल्हे व ग्रामपंचायत सरपंच, नागरिकांनी तहसीलदारांच्या दालनात बैठक घेऊन रोष व्यक्त केला. भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

विवेक कोल्हे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, असे असताना जनता दरबारातून स्वतःची पाठ थोपटून घेत जनता समाधानी असल्याचे आभासी चित्र विद्यमान लोकप्रतिनिधी उभे करत आहेत, अशी टीका विवेक कोल्हे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, जनता दरबारात भाजप व माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाच्या पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व सदस्यांना साधे निमंत्रण नाही. कुणाचा फोन आला तरच कामे होत आहेत. कुठेतरी पक्षपात होत आहे. प्रशासकीय यंत्रणा कुणाच्या दावणीला बांधली की काय, असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला.

प्रशासकीय यंत्रणेने कुणाचे नोकर न बनता जनतेचे सेवक बनावे व पक्षपातीपणा सोडावा. अन्यथा, नाइलाजास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही विवेक कोल्हे यांनी प्रशासनास दिला. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी उत्तरे देत उपस्थितांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

विविध योजना, जातींचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात दलाल निर्माण झालेले आहेत. त्यांचे लागेबांधे वरपर्यंत असून, सर्वसामान्यांना याचा त्रास होत आहे. त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. तसेच, योजनेसंदर्भात नागरिकांना प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते. हा प्रकार बंद व्हावा. स्वस्त धान्य दुकानदारांकडून पैसे घेतले जातात, हे योग्य नाही. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींच्या प्रस्तावांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्यात यावेत, ग्रामपंचायतींकडून आलेल्या गायी-गोठ्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून, ते तातडीने मंजूर करावेत.

धोंडेवाडी येथील बेघर लोकांना तातडीने गावठाण विस्तारीकरणासाठी सरकारी गट क्रमांक 448ची जागा देण्यात यावी, तसेच प्रलंबित प्रश्न प्रशासनाने ताबडतोब सोडवावेत, अशी मागणी कोल्हे यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT