Madhukar Pichad
Madhukar Pichad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : महाराष्ट्रातील वरपली या गावात 17 आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर देशातील पहिले आदिवासी बजट महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्याच्या आदिवासी विभागाचे माजी मधुकर पिचडांनी हे बजेट मांडले होते. हे बजेट देशात पथदर्शी ठरले. या बजेटची जन्म कथाच मधुकर पिचड यांनी सांगितली. Leaders like Sharad Pawar, Madhukar Pichad, Gavit had reached the village after walking 14 kilometers.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगी बाबत भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड म्हणाले, ती एक दुर्दैवी घटना होती. अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी करणे आवश्यक असते. मी तर आता राजकारणातून निवृत्त झालो आहे पण, मला आरोग्यमंत्री जास्त बोलताना दिसत आहे. राज्यातील मंत्र्यांनी कशावरही प्रतिक्रिया देण्यापेक्षा कामावर लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील मंत्रालयाच्या बजेटची जन्म कथा सांगताना मधुकरराव पिचड म्हणाले, पूर्वी नंदूरबार हा धुळे जिल्ह्याचाच एक भाग होता. तेथे कुपोषणामुळे 17 बालकांचा मृत्यू झाला होता. विरोधकांनी राजकारण तापविलं. त्यामुळे ज्येष्ठ नेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मला बोलावलं. आणि म्हणाले, "आपल्याला त्या गावाला भेट द्याची." त्यावर मी म्हणालो, "साहेब, मी सर्व चौकशी करून सांगतो. सौरभसिंह नाईक, माणिकराव गावित, तुम्ही आणि मी पहाणी करायला जाऊ."

त्यानुसार मी धुळ्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, या गावाला रस्ताच नाही. वरपळी असं गावाचं नाव होतं. मी विचारलं काय करता येईल. जिल्हाधिकारी म्हणाले, काहीच करता येणं शक्य नाही. मी सांगितलं, साहेबांचा जायचा आग्रह आहे. त्यावेळी ते म्हणाले, गुजराथ राज्यात उतरावं लागेल आणि 14 किलोमीटर पायी यावं लागेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं.

मी त्याच दिवशी दुपारी शरद पवारांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं, "त्या गावात जायला महाराष्ट्रात रस्ता नाही. जाणे अशक्य आहे. गुजराथमध्ये उतरावं लागेल. तेथून 14 किलोमीटर पायी जावं लागेल." यावर शरद पवार लगेच म्हणाले, "उद्या, सकाळी सात वाजता तयार रहा. गुजराथ मधून जायचं." त्यानुसार आम्ही तयारीला लागलो. मी धुळ्याच्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविलं तर त्यांनी रस्ता नसल्यानं येता येणार नाही, असं कळवलं. मात्र स्थानिक अधिकारी पाठवायची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी शरद पवार, मी, सौरभसिंह नाईक व माणिकराव गावित असे चौघे जण गुजराथमध्ये उतरलो. 14 किलोमीटर चालत वळपणीला गेलो. दुपारचे बारा-एक वाजले असावेत. गावात गेल्यानंतर बसायला खुर्च्या नव्हत्या. लोकांनी दोन खाटा टाकून बसायची व्यवस्था केली. तिथं खूप भयानक दारिद्र होतं. खायला नीट अन्न नव्हतं. शरद पवारांनी सर्व घरांत जाऊन पाहणी केली. त्यामुळे शरद पवारांच्या मनाची विशण्ण अवस्था झाली. ते म्हणाले, "मधुकरराव, आपण जन्माला येऊन काय मिळवलं. या लोकांचे दारिद्र दूर करण्याचे प्रयत्न जर आपल्याकडून झाले नाहीत तर आपला जन्म व्यर्थ आहे. या लोकांसाठी जे लागेल ते करू," असा निर्धार पवारांनी व्यक्त केला. तेथे लोकांना पैशाची मदत केली. अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आम्ही पायी पुन्हा गुजराथमध्ये आलो. तेथून मुंबई प्रवास केला.

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नियोजन मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे गेलो. त्यांना परिस्थिती व शरद पवारांचा निरोप दिला. त्यावेळी अण्णासाहेब शिंदे यांनी सुखटणकर समिती नेमली. या समितीने परिस्थितीची पाहणी करून आदिवासी समाजासाठी काय करता येईल याचा अहवाल सादर केला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत मी आदिवाश्यांना हक्काचे द्या, अशी मागणी केली.

पूर्वी कृषी, आरोग्य आदींना वेगळं बजेट होतं. त्यामुळे मी शरद पवारांना कल्पना मांडली. त्यानुसार आदिवासी मंत्रालयाचं स्वतंत्र बजेट सादर करण्यात आलं. मी आदिवाशांसाठीचे पहिले बजेट मांडणारा मंत्री ठरलो. आता हे बजेट पाच हजार कोटीवर गेलं आहे.

माझ्याकडून एक राहून गेलं. कारण त्यावेळी प्रशासनाचा त्याला भयंकर विरोध होता. प्रत्येक विभागात त्या त्या विभागाशी संल्गन तज्ज्ञ अधिकारी असतात. तसे आदिवासी विभाग अधिकाऱ्यांचं वेगळं केडर करा. ग्रामीण भागापासून मंत्रालयापर्यंत वेगळी प्रशासन यंत्रणा तयार करा. तर विकासाला गती येईल. प्रशासनाचा याला फार विरोध झाला. त्यामुळे आपल्याकडे ते राहून गेलं. अशी आदिवासी मंत्रालयाची प्रशासन यंत्रणा आंध्र प्रदेश, तेलंगणात झाली आहे. त्यामुळे तिथं आदिवासी भागात प्रचंड विकास झाला.

अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा मी सध्या कार्याध्यक्ष आहे. देशातील पहिलं आदिवासी बजेट मी मांडलं. त्यामुळे देशात या बाबत उत्सुकता आहे. लोक मला महाराष्ट्र पॅटर्न काय आहे, असे विचारतात. मी तो पॅटर्न समजावून सांगतो. त्यानुसार राजस्थान सरकारने मला बोलावले. तेथे मी आदिवासी बजेट बाबत सांगितलं. राजस्थाननं त्यानुसार आदिवासींचं बजेट मांडलं. त्याला 'राजस्थान आदिवासी मंत्रालय बजेट (महाराष्ट्र पॅटर्न)' असे नाव दिलं. याचा मला फार आनंद वाटला. देशात आपल्या महाराष्ट्राचं नाव झालं. आता देशात सगळीकडेच आदिवासी मंत्रालयाचे बजेट सादर होऊ लागलं आहे, असे मधुकर पिचडांनी अभिमानाने सांगितले.

आर.आर. पाटील, छगन भुजबळांच्या जागविल्या आठवणी

आघाडी सरकारमधील जुन्या आठवणी जागवताना ते म्हणाले, त्यावेळी आर.आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, अरुण गुजराथी, छगन भुजबळ व मी अशी चांगली टीम होती. छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर हल्ला झाला. त्यातून ते वाचले. परंतु आम्ही रमेश किणी प्रकरण लावून धरले. दादरला किणीच्या घरात मी व भुजबळ दोघे गेलो होतो.

नारायण राणे यांचा बंगला जाळला होता. त्यावेळी भुजबळांनी मला विचारलं, मधुकरराव काय करायचे? यावर मी म्हणालो, राणेंना भेटून यायचं. त्यावेळी मी व छगन भुजबळ हेलिकॉप्टरने गेलो होतो.

तेथे खूप लोक होते. भुजबळ म्हणाले, 'मधुकरराव, तप्त वातावरण आहे. सगळे माझ्यावर अटॅक करतील.' त्यामुळे मी पुढे झालो. नारायण राणेंचे भाऊ व कार्यकर्ते भेटले. मी हात जोडले. म्हणालो, दुःखाच्या प्रसंगी आम्ही राजकारण करायला आलो नाही. भेटायला आलो आहोत. साहेब आहेत का?, असे मी विचारले. यावर ते नाही म्हणाले. मी म्हणालो, 'आम्ही बंगला पहायला आलो आहोत. दंगामस्ती करू नका.' तेव्हा राणेंच्या भावाने सर्वांना बाजूला केले. मी भुजबळांना गाडीतून उतरायला सांगितले. आम्ही संपूर्ण बंगला पाहिला, अशी आठवणही मधुकर पिचड यांनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT