Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar District ) विधान परिषदेचे ( Legislative Council ) आमदार अरुण जगताप ( MLA Arun Jagtap ) यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022ला संपत आहे.

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022ला संपत आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय हलचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला या निवडणुकीत मतदानासाठी पात्र कोण अपात्र कोण या बाबत माहिती संकलित करुन पाठविण्याचे आदेश दिले आहेत. Legislative Council's trumpet sounded: Voter list criteria announced

या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात 15 नगरपरिषदा, 1 महापालिका, 1 जिल्हा परिषदेतील सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे केवळ सभापती मतदान करू शकतात. मात्र कोरोनामुळे जिल्ह्यात पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यात अकोले, पारनेर, कर्जत, शेवगाव व जामखेड नगरपरिषदांचा समावेश आहे. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. डिसेंबर अखेर पर्यंत उर्वरित 10 नगर परिषदांच्याही मुदती संपत आहेत. यात संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, देवळाली प्रवरा, राहुरी, शिर्डी, राहाता, पाथर्डी, नेवासे व श्रीगोंदे नगरपरिषदेचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या अखेरीला जिल्हा परिषद सदस्यांचीही मुदत संपत आहे.

ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासक नियुक्त आहेत तेथील सदस्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. किमान 75 टक्के मतदार तरी मतदानासाठी पात्र आवश्यक आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच मतदार यादी कार्यक्रम लावून मतदार यादी निश्चित करण्यात येईल. साधारण 1 डिसेंबरच्या आसपास मतदार यादी लागेल. तर 7 डिसेंबरच्या आसपास मतदार यादी निश्चित होईल, असे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.

मतदार यादी कार्यक्रम या पद्धतीने राबविला गेल्यास नियमानुसार 10 नगर परिषदांचे सदस्य पात्र ठरतील. मात्र यातही स्वीकृत सदस्य पात्र ठरवायचे अथवा नाही यावर अजूनही निर्णय झालेला नाही. हे पाहता राजकीय समीकरणे तपासण्याचे काम इच्छुक उमेदवारांकडून सुरू झाले आहे. ही जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. विद्यमान आमदार अरूण जगताप हे राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादीकडून जगताप यांच्या बरोबरच चंद्रशेखर घुलेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

पुढच्या निवडणुकीचे तिकिट पुन्हा आमदार अरुण जगताप यांना मिळते की आणखी कुणाला यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिलेही राजकीय समीकरणांची चाचपणी करत आहेत. कर्डिले व जगताप हे व्याही आहेत. अहमदनगर मधील नात्या गोत्याचे राजकारण पाहता हे दोघे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार नाहीत.

जिल्हा परिषद व महापालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. मात्र महापालिकेत आमदार संग्राम जगताप व त्यांचे सासरे शिवाजी कर्डिले यांचाच सिक्का चालतो. उर्वरित 10 नगरपरिषदांत सुमारे 213 सदस्य आहेत. यातील चार नगरपरिषदांवर भाजप आमदार समर्थकांचे प्राबल्य आहे. यात राहाता, शिर्डी, श्रीरामपूर व पाथर्डीचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील या निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

हे असतील मतदार

जिल्हा परिषद - 67, महापालिका - 67, पंचायत समिती सभापती - 14

नगरपरिषदांतील मतदार

संगमनेर - 28, श्रीरामपूर - 32, कोपरगाव - 28, देवळाली प्रवरा - 18, राहुरी - 21, शिर्डी - 17, राहाता - 17, पाथर्डी - 17, नेवासे - 17, श्रीगोंदे - 18.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT