Srinivas Patil, Sharad Pawar, Balasaheb Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabh Election 2024 : श्रीनिवास पाटलांची माघार; सातारा लोकसभेसाठी बाळासाहेब पाटलांना सर्वाधिक पसंती

Umesh Bambare-Patil

Satara Lok Sabha Meeting News : सातारा लोकसभेसाठी (Lok Sabh Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. त्यासाठी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच निवडणूक लढण्यास नकार दिला. बैठकीत सातारा लोकसभेसाठी नवीन चेहरा देण्याची मागणी झाली. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत सर्वाधिक मागणी झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनाच निवडणूक लढण्याची गळ घातली.

सातारा लोकसभेतील (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार ठरविण्यासाठी आज शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यात आले आहेत. सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टरने साताऱ्यात आगमन झाले. राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पवार बैठकीचे नियोजन केलेल्या साई सम्राट मंगल कार्यालयात दाखल झाले. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil), आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

पवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. यामध्ये पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाला विरोध केला. त्यानंतर कराड उत्तर व कराड दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पवार यांच्यापुढे केली. सर्वाधिक मागणी ही बाळासाहेब पाटलांच्या नावाला झाल्याचे सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदेंना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली, तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्वत:च बैठकीत सर्वांपुढे आपण प्रकृतीच्या कारणास्तव यावेळेस सातारा लोकसभेची निवडणूक लढणार नाही. त्यामुळे नवीन उमेदवार द्यावा, अशी मागणी केली.

एकूणच कराड, पाटण तालुक्यातून होणारा विरोध ओळखून पाटील यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे, तर स्वत: शरद पवार यांनीच साताऱ्यातून निवडणूक लढावी, अशी मागणी झाली. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT