dhananjay mahadik hasan mushrif satej patil sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मुश्रीफ-महाडिकांची अग्निपरिक्षा; एकटा 'पाटील' पडणार दोघांना भारी?

Shahu Chhatrapati Vs Sanjay Mandlik : कोल्हापुरात शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. पण, सतेज पाटील विरुद्ध महाडिक आणि मुश्रीफ, अशीच ही लढत रंगली होती.

Rahul Gadkar

Kolhapur News, 4 June : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) महायुतीमध्ये खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना निवडून आणण्याची खरी जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे.

तर, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांच्यावर आहे.

मागील तीन लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि महाडिक एकत्र होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने मुश्रीफ आणि महाडिक यांना यश मिळाले. तर 2019 च्या निवडणुकीत मुश्रीफ आणि महाडिक एकत्र असले, तरी शेवटच्या टप्प्यात महाडिकांना पराभव स्वीकारावा लागला होता.

आता पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकीत मुश्रीफ आणि महाडिक हे खांद्याला खांदा लावून खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यापेक्षा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचेच कडवे आव्हान मुश्रीफ आणि महाडिक यांच्यासमोर आहे.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी केंद्रीय पातळीवरून मुश्रीफ आणि घाटगे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या अग्निपरिक्षेत घाटगे-मुश्रीफ पास होणार का? हे चित्र स्पष्ट होईल.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडून शिंदे आणि अजित पवार गट हा भाजपत सहभागी झाला. यातच पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादी पक्षांवर हल्ला करणारे नेते त्यांच्याच वळचळणीला गेल्याचा मेसेज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यानं नाराजी पोहोचली. त्यातून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघात एकमेकाला पाण्यात पाहणारे नेते एकत्र आले. मात्र, कार्यकर्त्यांची मने शेवटपर्यंत दुभंगलेली होती.

अशा परिस्थितीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्याची खरी जबाबदारी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे. कागल मतदारसंघातील मुश्रीफ आणि जिल्ह्यात असणारी महाडिक गटाच्या पॉवरवर खासदार मंडलिक यांची राजकीय बेरीच अवबंलून आहे.

मात्र, या दोघांचे गणित बिघडवण्याचे काम काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केल्याचा अंदाज आहे. खासदार मंडलिक यांच्याबाबत असणारी नाराजी, महागाई, गॅस दरवाढ, स्थानिक राजकारण असे प्रचारातील मुद्दे घेत सतेज पाटील हे भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक करण्यात यशस्वी झाले.

शिवाय खासदार मंडलिक यांनी दत्तक प्रकरणाचा उकरून काढलेला वाद त्यांच्याच 'अंगलट' येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी केलेले प्रचाराचे नियोजन, शेवटच्या टप्प्यात टाकलेले डावपेच हे त्यांच्या विजयाचे कारण असू शकते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडे अनेक चेहरे असले, तरी जनतेच्या मनात शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आणि प्रतिष्ठा यावरूनच ही निवडणूक महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे महाराज की मंडलिक हे चित्र स्पष्ट होईल.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT