praniti shinde ram satpute sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde Vs Ram Satpute : 'बाहेरचा उमेदवार' म्हणून डिवचणाऱ्या प्रणितींना सातपुतेंचं जशास तसं उत्तर...

Akshay Sabale

भाजपची पाचवी आणि महाराष्ट्रातील दुसरी यादी रविवारी ( 24 मार्च ) जाहीर झाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ( Solapur Lok Sabha Election 2024 ) विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते ( Ram Satpute ) यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) विरुद्ध राम सातपुते या दोन युवक नेत्यांमध्ये लढत होणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी ( Praniti Shinde ) सातपुतेंना पत्र लिहिलं आहे. या माध्यमातून सातपुते हे आयात केलेले उमेदवार तर आपण सोलापूरची लेक असल्याचं चित्र प्रणिती शिंदेंनी निर्माण केलं आहे. या पत्रानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. लगेच सातपुतेंनीही प्रणिती शिंदेंना पत्रातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रणिती शिंदे पत्रात काय म्हणाल्या?

"मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसेच, या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला जी संधी मिळालीये त्याबद्दल शुभेच्छा देते," असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं.

"40 दिवस 'याचं' भान राखू"

"लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं, असं माझं मत आहे. पुढील 40 दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते," असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

राम सातपुते काय म्हणाले?

"आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम...! मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय," असं सातपुतेंनी सांगितलं.

"जातीपातीत फूट पाडण्याचं राजकारण कुणी केलं हे देशाला माहिती"

"मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्षं राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. वंदे मातरम्...!," असं म्हणत राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT