Vishal Patil sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : "माझ्या विमानाची दिशा पायलटनं ठरवली, मावळत्या खासदारांना अहंकार जास्त," विशाल पाटील कडाडले

Sangli Lok Sabha Election 2024 : संजयकाका पाटील, ठाकरे गट चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढत असलेले विशाल पाटील यांच्यात लढत झाली.

Akshay Sabale

Sangli News, 3 June : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. सांगलीत झालेल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काही संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात विशाल पाटील आघाडीवर असल्याचं दिसलं होतं. यामुळे संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) यांनी हॅटट्रीकची संधी हुकणार का? हे 4 जून रोजी स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील, ठाकरे गट चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) आणि काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढत असलेले विशाल पाटील यांच्यात लढत झाली. चंद्रहार पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतून जयंत पाटील आणि काँग्रसचे आमदार विश्वजित कदम यांनी प्रचार केला. पण, विश्वजित कदम यांनी विशाल पाटील ( Vishal Patil ) यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

यातच माझ्या विमानाच्या पायलटने दिशा ठरवल्यानं हे शक्य झालं, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे. तसेच, मावळत्या खासदारांना अहंकार जास्त असल्यानं जनतेनं मला उभं केलं, अशी टीका विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर केली आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

विशाल पाटील म्हणाले, "सर्व एक्झिट पोलमध्ये मी निवडून येणार असल्याचं दाखवत आहे. ही निवडणूक जनतेची आहे. माझी वैयक्तिक नाही. जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली होती. अर्ज भरलेल्या दिवसापासून निवडणूक हाताबाहेर गेली होती. जनतेचा कौल एक्झिट पोल घेणाऱ्यांना दिसला असेल. त्यामुळे जनतेनं बदल करायचे ठरवलं आहे, हे निकालातून दिसून येईल."

"भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगतो. 400 पारचा आकडा पार करणार असल्याचं बोलतात. पण, अपक्ष उमेदवार आणि वसंतदादांचा नातू पराभूत होण्यासाठी ज्या पातळीवर निवडणूक नेहण्याचा प्रयत्न केला, त्यातून त्यांची संस्कृती दिसून येते. ही गोष्ट जनतेला आवडली नाही," असं विशाल पाटलांनी म्हटलं.

"सांगलीतील जनता खूप शांत आहे. त्यांना अहंकार चालत नाही. मावळत्या खासदारांना अहंकार जास्त झाल्यानं जनतेनं मला उभं केलं. खालच्या पातळीवर टीका करणं हे खासदारांना फायद्याचं ठरलं, असं मला वाटत नाही," अशा शब्दांत विशाल पाटलांनी फटकारलं आहे.

"मी काँग्रेसचा उमेदवार आहे. हे बंड सांगलीतील काँग्रेसचं आहे. महाविकास आघाडीच्या विचारांचा उमेदवार मी आहे. जेवढ्या लवकर ते घटकपक्ष स्विकारतील तेवढं चांगलं होईल. ही लढाई भाजपविरोधात आहे, हे महाविकास आघाडीनं विसरू नये. भाजपविरोधात जे करायचं होतं, ते घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलं आहे. माझ्या विमानाची दिशा पायलटने ठरवली. त्यामुळे हे शक्य झालं," असं विशाल पाटलांनी सांगितलं आहे. त्यामुळे विशाल पाटलांच्या विमानाचे पायलट कोण हे निकालानंतर समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT