Sangli News : महाविकास आघाडीतील घटक पक्षात जागावाटपावरून ठिणगी पडली आहे. विशेषतः सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत वाद असून, या ठिकाणी शिवसेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस व शरद पवार गटात वाद असतानाच या ठिकाणाचा उमेदवार शरद पवार गटाने जाहीर केला आहे. त्यामुळे हा वाद काँग्रेसच्या नेत्याने दिल्ली दरबारी नेला आहे. त्यासाठी काँग्रेसचे सांगली येथील शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले आहे.
महाविकास आघाडीमध्ये वादग्रस्त ठरलेल्या सांगलीच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शुक्रवारपासून तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत. संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचताच ही जागा काँग्रेसला सुटत नसल्याने कमालीचे नाराज झालेले आमदार विश्वजित कदम (Vishvjeet Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) तातडीने खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेवरून काही तोडगा निघतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Election 2024 News)
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीत दाखल होताच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यापुढे संसदेत जाण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल, असे विधान केले. याशिवाय सांगलीची जागा शिवसेना लढणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांत सत्ता आल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असेही वक्तव्य त्यांनी या वेळी केले.
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत शुक्रवारी सांगलीत दाखल झाले आहेत. कवलापूर येथील विमानतळ येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी बोलताना संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.
महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांची बैठक उद्या नियोजन करण्यात आला असून, आज सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नेत्यांना शिवसेनेकडून अधिकृत निरोप देण्यात येईल, अशी भूमिका ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी घेतली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे सांगलीमधून शिवसेना माघार घेणार नाही, विशाल पाटील यांच्यासाठी दोन पर्याय समोर आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये राज्यसभेचा एक पर्याय देण्यात आला असून, दुसरा पर्याय विधानसभेला उभं राहिल्यास पूर्णतः त्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, गुरुवारी आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील तातडीने खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेवरून काही तोडगा निघतो का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनीसुद्धा ठाकरे गटावर आरोप केले आहेत. सांगलीच्या जागेचा निर्णय दिल्ली दरबारी होणार असून, दिल्लीतून निर्णय आल्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती, निमंत्रण नसल्याचे विक्रम सावंत यांनी म्हटले आहे.
R