Sanjay Raut, Vishal Patil, Narayan Rane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : संजय राऊतांचे मोठं विधान; विशाल पाटलांना संसदेत, तर नारायण राणेंना तिहार जेलमध्ये पाठविणार...

Anil Kadam

Sangali Loksabha News : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यापुढे संसदेत जाण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल, असे विधान खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीत दाखल होताच केले. याशिवाय सांगलीची जागा शिवसेना लढणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांत सत्ता आल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असेही वक्तव्य त्यांनी या वेळी केले.

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत हे आज सांगलीत दाखल झाले आहेत. कवलापूर येथील विमानतळ येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी बोलताना संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी आहे असे आम्हाला वाटत नाही. शिवसेनेचे काम जोरात सुरू असते एकदा ठरले की ठरले. काँग्रेसचे तसे नाही. त्यांना वरिष्ठांना विचारावे लागते. आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लागतो. आमची राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. तेही चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी कामाला लागतील अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे आमचेच आहेत. त्यामुळे मी त्यांना नक्कीच भेटणार. आघाडीत मतदारसंघ मागेपुढे होत असतात. कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांच्याविषयी आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील हे संसदेत यापुढे कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. राऊत यांच्या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकरणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना अटक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत दोन महिन्यात सत्ता आल्यानंतर राणे यांच्या ईडी आणि सीबीआयने बंद केलेल्या फायली पुन्हा उघडण्यात येतील. त्यानंतर राणे तिहार जेलमध्ये असतील, असा दावाही त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT