Satara News: महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे निव्वळ विजय- पराजय नसून, ते आगामी काळातील मोठ्या राजकीय संघर्षाची नांदी आहे. मतदारांनी आपला कौल दिला असला, तरी या निवडणुकीत दिसलेली नेत्यांची हतबलता, अकारण अट्टहास, सूडभावना आणि निष्ठावंतांची केलेली जिरवाजिरवी यामुळे विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या नेत्यांनाही आता ‘आत्मपरीक्षण’ केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या काही भागांत भगवा फडकला असला, तरी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या वर्चस्वाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सुरुंग लावला आहे.
तळदेव गटात राष्ट्रवादीची झालेली पीछेहाट ही मंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राजेंद्र राजपुरे यांच्या शब्दाला वजन न देता संजूबाबा गायकवाड यांच्या हट्टापायी राष्ट्रवादीने हा गड गमावला. ‘आयात उमेदवार नको’ ही कार्यकर्त्यांची भावना नेत्यांनी दुर्लक्षित केली आणि तिथेच घात झाला. याउलट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अजित संकपाळ यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांचा केलेला डोंगरची जादू चालवली. राष्ट्रवादीतून नाराज होऊन भाजपमध्ये गेलेले सुभाष सोंडकर यांनी केलेल्या खेळीने राष्ट्रवादीचे गणित अधिकच बिघडले. तळदेव गणातही संजय शेलार यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला अक्षरशः ‘व्हाइट वॉश’ दिला आहे.
येथे बाबूराव दादा संकपाळ यांच्यासारख्या हुकमी राजकारण्याला एकनाथ शिंदे आणि दगडू सकपाळ जोडीने चारीमुंड्या चीत केले. तळदेव गणात दोन्ही बाजूने नाराजी नाट्य रंगले. शिवसेनेत संतोष शेलार आणि गणेश उतेकर, तर राष्ट्रवादीत सागर कदम, भाऊ मोरे आणि संजय उतेकर यांच्यात तिकिटासाठी संघर्ष होता. राष्ट्रवादीने संजय उतेकर यांना, तर शिवसेनेने संजय शेलार यांना रिंगणात उतरवले. अखेर शिंदेंच्या सभेचा प्रभाव आणि पक्षांतर्गत नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसून संजय शेलार विजयी झाले, तर कुंभरोशी गणात राष्ट्रवादीने राजेंद्र राजपुरे यांचे समर्थक सचिन उतेकर यांना संधी दिली, तर शिवसेनेने संजय मोरे यांना पसंती दिली. यामुळे इच्छुक समीर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. भाजपचे सुरेश जाधव आणि सनी मोरे यांच्यामुळे ही लढत शेवटपर्यंत अटीतटीची ठरली. मात्र, मोरे यांनी केवळ ३३४ मतांनी ही जागा खेचून आणत शिवसेनेचा दबदबा निर्माण केला.
(कै.) बाळासाहेब भिलारे यांचा बालेकिल्ला असलेल्या भिलारमध्ये राष्ट्रवादीने आपले अस्तित्व अबाधित ठेवले असले, तरी अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. तेजस्विनी भिलारे यांनी पंचायत समितीच्या तिकिटासाठी दिलेला हक्काचा लढा आणि मकरंद पाटील यांनी घेतलेली सावध भूमिका यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसले, तरीही राजेंद्र राजपुरे यांच्या वादळासमोर वंदना भिलारे यांनी माजी सभापती रूपाली राजपुरे यांच्या साथीने एकतर्फी विजय साकारला. भाजपचे तालुका प्रमुख अनिल भिलारे यांनी आपल्या पत्नीसाठी धरलेला अट्टहास आणि पक्षांतर्गत झालेला विरोध यामुळे भाजपला या ठिकाणी स्वतःचे घरही सावरता आले नाही. भिलार गटामध्ये राष्ट्रवादीने संजय केळगणे यांच्या रूपाने ६०९३ मताधिक्याने विजय मिळवला. भाजपने येथे रंजना कदम यांना उतरवले होते. मात्र, मकरंद आबा आणि राजेंद्र राजपुरे यांच्या नियोजनापुढे भाजपचा निभाव लागला नाही.
मेटगुताड गणात भाजपने अमिना शारवान यांना उमेदवारी देऊन ‘अनोखा प्रयोग’ केला, तर शिवसेनेने ‘मराठा कार्ड’ खेळून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व जातीय समीकरणांना धुडकावत राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले यांनी विजय मिळवला. राजेंद्र राजपुरे यांचा वैयक्तिक संपर्क आणि विकासकामांची पोचपावती मतदारांनी येथे दिली आहे. यामुळे पंचायत समितीवरील सत्ता राष्ट्रवादीने कशीबशी टिकवली असली तरी ‘मिले-जुले सरकार’ स्थापन करण्याची वेळ आता नेत्यांवर आली आहे.
या निवडणुकीने भाजपच्या जिल्हा आणि तालुका नेतृत्वाचे धिंडवडे काढले आहेत. पक्षात जुने- नवे असा वाद उफाळून आला असून, भाजपमध्ये पडलेली चार शकले पक्षाला रसातळाला नेत आहेत. ‘स्वतःचे घर सावरता येत नाही आणि दुसऱ्याचे घर फोडण्याची भाषा’ करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी चपराक दिली आहे. भाजप नेतृत्वाला आता एकजुटीशिवाय पर्याय नाही, अन्यथा आगामी विधानसभेत भाजपचा शोध घ्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बालेकिल्ला असलेल्या काही जागांवर राष्ट्रवादीला आलेली हतबलता ही ‘कार्यकर्त्यांच्या भावनेपेक्षा नेत्यांचा अट्टहास’ मोठा ठरल्याचा परिणाम आहे. मकरंद पाटील यांच्या विकासकामांना घरच्याच नाराजांनी सुरुंग लावल्याने आता सावध होण्याची वेळ आली आहे, तर शिवसेनेची भरारी की ‘इशारा’ हे पाहता शिवसेनेने जरी तीन जागा जिंकून ‘व्हाइट वॉश’ दिला असला, तरी ही एकनाथ शिंदेंची जादू आहे की राष्ट्रवादीतील फाटाफुटीचा फायदा, याचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांना शोधावे लागेल.
या निवडणुकीत मतदारांनी ‘संजय’ नावाच्या तीन कारभाऱ्यांच्या (संजय केळगणे, संजय शेलार, संजय मोरे) हाती सत्तेची चावी दिली आहे, तर ‘अजित’ (संकपाळ) यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. महिलांमध्ये शकुंतला आणि वंदना यांच्या रूपाने नवे नेतृत्व पुढे आले आहे. मात्र, पंचायत समितीमध्ये आता एकमेकांना शिरजोर ठरणारे राजकारण करावे लागणार असल्याने हे नवे कारभारी विकास करणार की पुन्हा ‘जिरवाजीरवी’त अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.