Sharad Pawar-Mahadev Jankar-Jayant Patil
Sharad Pawar-Mahadev Jankar-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंतराव, पवारसाहेब तुम्ही-आम्ही पाहुणे होऊ शकतो : जानकरांचा राष्ट्रवादीपुढे मैत्रीचा हात

सरकारनामा ब्यूरो

सांगली : मराठा सामाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. कारण, शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिले. शाहू महाराज आणि माझी जात एक आहे. शाहू महाराज आणि मी एक आहे. शाहू महाराजांची बहिण होळकरांच्या घरी दिली आहे, त्यामुळे जयंतराव पाटील (Jayant Patil) तुम्ही आम्ही पाहुणे होऊ शकतो, काही काळजी करू नका. पवारसाहेब (Sharad Pawar) तुम्ही आम्हीपण पाहुणे होऊ शकतो, असे सांगून आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी राजकारणाची पुढील दिशा नकळत स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. (Mahadev Jankar's hand in front of NCP for political friendship)

सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शनिवारी (ता. २ एप्रिल) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात माजी मंत्री महादेव जानकर बोलत होते.

माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे आपण आहात. देशात समतावादी युग बनले पाहिजे. पूर्वी जाती कोठ्या होत्या. जाती निर्माण करणारे वेगळेचे होते. समता प्रस्थापित करायची असेल जाती-जातीमध्ये भांडणं लावून मोठे होणार नाही.

धनगर समाजाला एनटीच्या सवलती ह्या शरद पवारांनीच मिळवून दिल्या आहेत. एसटीचे आरक्षण लागू व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले. ‘एसटी’साठीचा टाटा कन्स्लटन्सीचा अहवाल निर्माण करण्यात मीही होतो. मात्र, त्यात आम्हाला अपयश आले. त्यानंतर एसटी समाजाच्या १३ योजना धनगरांना लागू कराव्यात; म्हणून मीच समिती स्थापन करायला लावली. त्यासाठी मागच्या सरकारने १००० कोटी दिले. मात्र, आचारसंहितेमुळे ते वापरता आले नाहीत. त्यात आणखी एक हजार कोटी घालून समाजाला एसटीच्या योजना लागू कराव्यात, त्यातून समाजाचा विकास होईल. हे तुम्ही करू शकाल, हा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगून तुम्ही ते करून घ्याल, अशी खात्री आम्हाला आहे. तसेच आमच्या विष्णू माने यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना घोंगडं घातलं आहे, तेही हे काम करून घेतील, अशी मागणी जानकर यांनी या वेळी बोलताना केली.

ते म्हणाले की, राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी शरद पवारांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जयंत पाटील तुम्ही ‘करेक्ट कार्यक्रम’ कारायला महाराष्ट्रात एक नंबरचे हुशार आहात. मी मंत्री होतो, सध्या आमदार आहे, पण या स्मारकासाठी दहा रुपयांची वीटसुद्धा दिली नाही. त्यानंतरही मला कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT