Mahadev Jankar reply to Devendra Fadnavis, Mahadev Jankar Latest News in Marathi
Mahadev Jankar reply to Devendra Fadnavis, Mahadev Jankar Latest News in Marathi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आम्ही युतीसोबत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला : जानकरांचे फडणवीसांना उत्तर

सरकारनामा ब्यूरो

()आटपाडी (जि. सांगली) : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) म्हणतात की, ‘आम्हाला (राष्ट्रीय समाज पक्षाला, Rsp) मंत्रिपद दिले.’ म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही. आम्ही युतीत होतो; म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्ही युती सोबत नसतो, तर फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का?, असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला. (Mahadev Jankar's reply to Devendra Fadnavis regarding commentary of ministerial post)

जानकर म्हणाले की, देशातील दोन महत्वाचे पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसचे धोरण हे सारखेच आहे. ‘फोडा-झोडा आणि राज्य करा, छोट्या पक्षाशी दोस्ती करा, सत्ता मिळवा, वापर करा आणि त्यांना सोडून द्या,’ हेच धोरण दोन्ही पक्षांनी राबविले आहे. ते अनुभवले आहे. (Mahadev Jankar Latest News in Marathi)

माजी मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या करगणी येथील निवास स्थानी आले होते. त्यावेळी जानकर यांनी माध्यमांशी विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केली. ते म्हणाले की राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची दोन टक्के मते आहेत. महायुतीमध्ये आम्ही होतो; म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला होता. आम्हाला मंत्रीपद दिले होते, म्हणजे आमच्यावर मेहरबानी केलेली नाही. सोबत आम्ही नसतो तर विचार करा. आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरणारे नव्हे; तर शेताच्या बांधावरचे नेते आहेत. विकासापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी हनुमान चालिसा, अजान, मंदिर, मशिद विषय पुढे केले जात आहेत, असा आरोपही जानकर यांनी या वेळी बोलताना केला.

राज्यातील नेत्यांवर वारंवार पडणाऱ्या ईडीच्या छाप्याबाबत जानकर म्हणाले की, ईडीची कामगिरी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोचली आहे. परवाच एका ज्वारी विकायला चाललेल्या शेतकऱ्यांशी बोलत होतो. तेव्हा ते म्हणाले की, साहेब इडी बिडी पाठवशिला. विनोदाचा भाग सोडला, तर सर्वांना सारं समजतंय, काय चाललं आहे ते.

'सब समान, देश महान' या धोरणाने रासपची वाटचाल सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाची धोरणे मात्र वेगळी आहेत. इतर पक्षांचे आमदार, खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे, हेच त्यांचे धोरण आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याचा लढा लढला आणि भाजपने त्याची फळे चाखली. आम्ही फक्त पालखीचे भोई राहिलो आहेत. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. शाहू महाराजांच्या वंशजाला आज मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागत आहे.,तर धनगर समाजाला आमदार- खासदार-सभापती पद दिल्यावर ते येड्यागत पळतंय. समाज मात्र आहे तिथेच आहे. तरुणांना हवे काय ते कोणच विचारत नाही, अशी खंतही जानकर यांनी या वेळी बोलून दाखवली. पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, युवकचे जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT