Rajesh Patil, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandgad Assembly Elcetion : 'चंदगड'च्या जागेवरून महायुतीत घमासान, अजितदादांच्या जागेवर भाजपचा डोळा

सरकारनामा ब्युरो

Kolhapur News, 16 Oct : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघावर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात (Chandgad Assembly Constituency) महायुतीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या राजेश पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चंदगडचे भाजप (BJP) नेते शिवाजी पाटील यांनी या मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर भाजपच्या संग्राम कुपेकर यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत होण्याचे शक्यता आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी गटाचे आमदार राजेश पाटील असले तरीही भाजप नेते शिवाजी पाटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोणतेही पद नसताना कोट्यावधी रुपयांची विकासकामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत.

शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत. नुकतंच त्यांनी 'जय जवान जय किसान' हा महामेळावा घेतला होता. त्याद्वारे त्यांनी विधानसभा निवडणुकांच रणशिंगण फुंकल्याचं बोललं जातं. या मेळाव्याला गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, यांच्यासह खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

या मेळाव्या दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजी पाटील यांचं कौतुक करत त्यांच्या विकासकामांचा पाढा वाचला. शिवाजी पाटलांनी स्वतःसाठी काय मागितले नाही, तर या मतदाराचासंघासाठीचं जे मागायचं ते मागितल्याचा उल्लेखही केला. तर तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, याच मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील (MLA Rajesh Patil) हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यापूर्वी अजित पवारांनी त्यांना निवडणूक लढण्याबाबत ग्रीन सिग्नल देखील दिला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचा दावा त्यांनीही केला आहे. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असल्याचं सांगितल आहे.

शिवाजी पाटील यांच्या सर्व घडामोडींवर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील धोरणाप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगडमध्ये येऊन त्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे अजितदादा भाजपला योग्य ती दखल घ्यायला लावतील असेही मुश्रीफ म्हणाले.

तर दुसरीकडे राजेश पाटलांकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जातं. मात्र, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यामुळे याचा तोटा महायुतीला होणार आहे. तर महायुतीने कोणत्याही परिस्थितीत निकष बदलून चंदगड विधानसभेचा उमेदवार बदलून भाजपला जागा द्यावी अशी मागणी भाजपनेते संग्राम सिंह कुपेकर यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून महायुतीत घमासाम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

चंदगड विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार

- आमदार राजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

- शिवाजी पाटील - भाजप

- संग्राम कुपेकर - भाजप / अपक्ष

- नंदाताई बाभुळकर - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

- गोपाळराव पाटील - काँग्रेस

- राजेंद्र गड्डेनवार - जनसुराज्य पार्टी

- मानसिंग खराटे, विनायक पाटील - अपक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT