मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) भाजपचा पराभव केला. पण तीन पक्ष एकत्र येऊनही जयश्री जाधव यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. या निवडणुकीत भाजपचे (BJP) सत्यजित कदम यांना मिळालेली मतं आघाडीसाठी धडकी भरवणारी आहे. भाजपला एवढी मतं कशी मिळाली, याचं कारण खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरूवारी पहिल्यांदाच सांगितलं आहे.
किसान मोर्चा प्रदेश कार्यसमितीच्या मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात आपलं सरकार येणार आहे, बुथ रचना मजबूत हवी, असं सांगताना पाटील यांनी कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये विरोधकांच्या तोंडाला फेस आणला होता. जिंकलोच होतो, थोडक्यात गडबड झाली. हा फेस का आला, पाच बूथचं एक शक्ती केंद्र होतं. त्याचा एक प्रमुख, एक जिल्ह्यातला आणि पुणे, पिंपरीतला एक प्रमुख अशा तिघांचं युनिट केलं. या तिघांनी पाच हजार मतांवर लक्ष द्यायचं. त्याचा परिणाम असा झाला की, बंटी पाटील यांच्या बावड्यामध्ये बुथ क्रमांक एकवरच भाजपचं 80 चं लीड होतं.
शेतकरी नेते बना
आपण भाजपचे नेते बनण्यापेक्षा शेतकऱ्यांची नेते म्हणून आपली ओळख व्हायला हवी, असं आवाहन पाटील यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केलं. भाजपच्या नेत्यांपेक्षा शेतकऱ्यांचे नेते व्हायला पाहिजे. आपण कमर्शियल आंदोलनवाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घुसा, जे होईल ते होईल. आपली पायाला भिंगरी लावून फिरायला हवं. शेतकरी नेते व्हायला हवे. घरी बसून शेतकरी संघटन होणार नाही, असं पाटील म्हणाले.
पुढचं आंदोलन दुप्पट डिपॉझिटविरोधात
वीजेचे मोठं संकट आलं आहे. भारनियमन सुरू आहे. कोविड काळात मोठ्या प्रमाणात बिलं दिली. ती बिलं भरत नाही म्हणून वीजजोडण्या तोडण्यात सुरूवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष होता. अधिवेशन सुरू होतं. एक दिवस मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं की, आज अधिवेशन चालू द्यायचं नाही. शेवटी सरकारने घोषित केलं की, पावसाळा सुरू होईपर्यंत काही कारवाई करणार नाही.
आता नवीन संकट सुरू झालं आहे. त्यांनी कोळसा टंचाई नावाने भारनियमन सुरू केले आहे. जिथे जिथे भ्रष्टाचार करता येईल, तिथे सुरू आहे. फार काळ सरकार चालणार नसल्याने हे सुरू आहे. ही कृत्रिम वीजटंचाई आहे. तुम्हाला राज्य सरकार चालवायचंय की गावात एखादं थिएटर चालवायचंय. कोळशाचं नियोजन आधीच करायला हवं होतं. पण ते केलं नाही. पोलिसांच्या बदल्यांमध्ये, कोविडमध्ये पैसे घेतले. 2014 ते 19 मध्ये केव्हाही भारनियमन झालं नाही. त्याकाळात जादा वीज होती. आता डिपॉझिट दुप्पट करणार आहे. यातून चार ते पाच हजार कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न आहे. हे हाणून पाडायला हवे. त्याविरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.