2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना होण्याचे संकेत असून सांगली जिल्ह्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत दोन पूर्ण लोकसभा मतदारसंघ आणि एक विधानसभा मतदारसंघ वाढणार असल्याचे संकेत दिले.
ईश्वरपूर हा नवा लोकसभा मतदारसंघ होण्याची शक्यता असून काही विद्यमान विधानसभा क्षेत्रे त्यात जोडली जाऊ शकतात.
Sangli Politics News : आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मतदारसंघ पुनर्रचना होणार, असे स्पष्ट संकेत याआधी मिळाले होते. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची अनौपचारिक घोषणा करताना जिल्ह्यात पूर्ण दोन लोकसभा मतदारसंघ होतील आणि एक विधानसभा मतदारसंघ वाढेल, असे स्पष्ट केले आहे. खासदार विशाल पाटील हेही संसदेत नव्या रचनेबद्दल बोलताना दिसत आहेत. तसे घडल्यास ईश्वरपूर हा नवा लोकसभा मतदारसंघ होऊ शकतो आणि भौगोलिक सलगतेच्या मुद्द्यावर शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी हे मतदारसंघ त्याला जोडले जाऊ शकतात. सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांचा समावेश राहील, असा प्राथमिक अंदाज आहे.
नवीन संसद सभागृहाचे बांधकाम करताना तेथे ८८८ सदस्यांची आसन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. धोरण स्पष्ट आहे की, भविष्यात मतदारसंघांची संख्या वाढवली जाणार आहे. देशाची लोकसंख्या वाढल्याने सध्याच्या शासनाच्या विचाराधीन धोरणानुसार सुमारे १० लाख मतदारसंख्येला एक लोकसभा मतदारसंघ अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्ह्यात पूर्ण दोन मतदारसंघ होऊ शकतात.
सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून उर्वरित दोन मतदारसंघ लगतच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहेत. आता सहा तालुक्यांचा एक आणि चार तालुक्यांचा एक असे दोन मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. अर्थात, त्याचे निकष कसे लावले जातील, भौगोलिक समानतेचा मुद्दा असेल का, दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ राहू शकतो का, असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
महिला आरक्षणाची चर्चा
२०२९ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांसाठी देशभरात महिला आरक्षण लागू होऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे अनेक मान्यवरांनी आपल्या सौभाग्यवती, सूनबाई आदी कुटुंबीयांना मतदारसंघातील संपर्क वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महिला मतदारांवर प्रभाव पडावा, यासाठी कुटुंबातील महिला सदस्यांना, निवडणूक असो वा नसो, मतदारसंघात कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचे दिसते.
शक्यतांची आकडेवारी
मिरज – ३,४३,८७६
सांगली – ३,५६,४१०
तासगाव-कवठेमहांकाळ – ३,१२,८८६
जत – २,९१,३६३
एकूण मतदार – १२,३१,७३०
ईश्वरपूर – २,८०,८५६
शिराळा – ३,०७,०१२
पलूस-कडेगाव – २,९२,८६६
खानापूर – ३,५०,९९६
एकूण मतदार – १३,०५,१२१
विधानसभेतील बदल असे होऊ शकतात...
१) शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश. त्यातील महामार्गाच्या पूर्वेकडील ही गावे ईश्वरपूर मतदारसंघाला तोडली जाऊ शकतात.
२) मिरज तालुक्यातील ८ गावांचा ईश्वरपूर मतदारसंघात समावेश. ही गावे सांगली मतदारसंघाला जोडली जाऊ शकतात.
३) तासगाव तालुक्यातील २० गावांचा खानापूर मतदारसंघात समावेश. ही गावे तासगावला जोडली जाऊ शकतात.
४) कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागाचा पुन्हा एक विधानसभा मतदारसंघ होऊ शकतो.
५) सांगली, मिरज, कुपवाड ही तीन शहरे व पश्चिम भागातील सर्व गावे मिळून दोन मतदारसंघ होऊ शकतात.
1. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय?
मतदारसंघांची सीमा व रचना बदलण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्रचना.
2. सांगली जिल्ह्यात काय बदल होणार आहेत?
दोन लोकसभा मतदारसंघ तयार होण्याची आणि एक विधानसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे.
3. ईश्वरपूर लोकसभा मतदारसंघ काय आहे?
नवीन प्रस्तावित मतदारसंघ असून त्यात काही विद्यमान विधानसभा क्षेत्रांचा समावेश होऊ शकतो.
4. कोणते भाग नव्या मतदारसंघात येऊ शकतात?
शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी हे भाग जोडले जाण्याची शक्यता आहे.
5. या बदलांचा राजकारणावर काय परिणाम होईल?
नवीन राजकीय समीकरणे तयार होतील आणि स्थानिक नेतृत्वावर त्याचा प्रभाव पडेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.