Sindhudurg News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयघोष अख्या राज्यात केला जात आहे. शिवजंयतीनिमित्त राज्याप्रमाणे शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडीतील गांधी चौकात करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा हिंदू रक्षणासाठी गर्जना करताना मुस्लिमांसह स्वकीयांना इशारा दिला आहे. त्यांनी हिंदू धर्माचा इतिहास टिकवण्यासाठी कडवट व्हा, असे आवाहन केले आहे.
ते येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शिवप्रेमी व गोरक्षक आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, विवेक कुलकर्णी, विनायक रांगणेकर, अजित फाटक, चिन्मय रानडे, कृष्णा धुळपणवर, दिनेश गावडे, आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी धर्मासोबत कधीही तडजोड केली नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावलं. स्वतःच्या कुटुंबाचाही विचार न करता माझा हिंदू धर्म टिकायला हवा म्हणून लढा दिला. यामुळेच आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
मात्र, स्वतःची दुकाने चालविण्यासाठी आपल्या दैवताचा हाच इतिहास पुसून टाकण्याचे षडयंत्र काही शक्ती करू पाहत आहेत. मात्र, त्यांचा हा हेतू हाणून पाडण्यासाठी व खरा इतिहास टिकविण्यासाठी आपणा सर्व हिंदूंना कडवट होणे गरजेचे असल्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले.
हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा दिला. मिर्झाराजे वगळता हिंदू स्वराज्यावर आक्रमण करणारे सर्व योद्धे हे मुस्लिमच होते. त्यामुळे उगाचच इतिहास पुसणाऱ्यांची दुकाने बंद पाडण्याची हीच वेळ आहे. ‘छावा’ चित्रपट आला नसता तर आज जो राग, आग बाहेर पडतेय ती आली नसती. चित्रपटात संभाजी राजेंना कसं मारलं हे दाखवल्यानेच ही आग बाहेर पडत आहे. पण, दुसऱ्या धर्मात ही गोष्ट करावी लागते का? इस्लामबद्दल चित्रपट बनतात का? महंमद पैगंबराची आठवण करून द्यावी लागते का? हे खरे प्रश्न आहेत. धर्मांतरणापासून आपल्या भगिनीला वाचवलं पाहिजे, असेही आवाहन राणे यांनी केल आहे.
तर गोवंशहत्या, महिलांकडे वाकड्या नजरेने पाहील तर ते सहन करून घेणार नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत असून आता सरकारही हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे माझ्या हिंदू बांधवांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय मी राहणार नाही. मला वर्दीची गरज नाही. मी भक्कम आहे. असे प्रकार दिसल्यास किंवा समजल्यास तिथे स्वतः जाऊन माझ्या पद्धतीने बंदोबस्त केल्याशिवाय मी राहणार नाही असा दमच त्यांनी भरला आहे. तर आपला परका असा भेदभाव न करता. हिंदूंना त्रास देताना आपले जरी सापडले तर चार फटके अधिक बसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.