Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधानपरिषद आणि विधानभेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी विधिमंडळाच्या बाहेरही आंदोलन करत घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली. यात मंत्र्यांनी भाजपकडून सातत्याने गळचेपी होतं असल्याचा आरोप करत राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांनी भाजपविरोधात तापवलेल्या या वातावरणानंतर आता सातारा जिल्हा परिषदेत घडलेलं प्रकरण नेमकं काय होतं असा प्रश्न विचारला जातोय.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. तसेच राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली, यामुळे दोघांनाही मतदान करता आले नाही. याचाही भाजपला थेट फायदा झाला. याच अटकेवरून राज्याच्या राजकारणात वादळ आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बापू उर्फ दिनकर शिंदे यांचं अपहरण झाल्याचा आरोप करत त्यांचाच मुलगा विकास शिंदे याने तक्रार दिली. याच तक्रारीच्या आधारे राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी महाबळेश्वरमध्ये सदस्य मुक्कामी असलेल्या हॉटेलवर जाऊन झडती घेतली. पण हाती लागले नाही.
या झडतीनंतर अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करणार अशी चाहूल मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांना लागली. खबरदारीचा उपाय म्हणून स्वतः मंत्र्यांनी या सदस्यांना आपल्या गाडीतून थेट जिल्हा परिषदेत आणले. मकरंद आबा आणि शंभुराज देसाई या सर्वांना सभागृहाकडे घेऊन जात होते. त्याचवेळी जिन्यात या दोघांनाही अटक करण्यासाठी पोलिसांनी अडवलं.
यावेळी पोलीस आणि शंभुराज देसाईंमध्येही बरीच झटापट झाली. या झटापटीत शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली, त्यांचा रक्तदाबही वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी मकरंद पाटील यांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या राड्यानंतरही पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना सभागृहात जाण्यापूर्वीच अटक केली. त्यांना अटक करून महाबळेश्वरला नेण्यात आले.
बापू शिंदेंचा जबाब :
पण या अटकेपूर्वी आणि अटकेवेळी ज्या बापू शिंदे यांचं अपहरण झाल्याची तक्रार होती त्यांनी आपलं अपहरण झालं नसल्याचा दोनवेळा जबाब दिला होता. बापू’ महाबळेश्वर पाेलिस ठाण्यात रात्री 12 वाजता पाेहाेचले. मात्र, त्यांना ‘साताऱ्या’त जाण्यास सांगितलं. तेव्हा ‘शंभूराज देसाई यांनी थेट ‘एसपीं’ना काॅल केला. ‘मकरंदआबां’नीही पहाटे 4 वाजता ‘वाई’च्या ‘डीवायएसपीं’ना झाेपेतून उठवलं. अखेर पहाटे 5 वाजता ‘वाई पाेलिस ठाण्या’त ‘माझं अपहरण झालेलं नाही. आमच्या मंडळींना विनाकारण त्रास देऊ नये,’ असा लेखी जबाब दिला.
विधिमंडळात पडसाद :
त्यानंतरही पोलिसांनी या दोघांना अटक करून मागील दाराने बाहेर घेऊन गेले. यावरून आता भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. विधानपरिषदेत आमदार हेमंत पाटील, विक्रम काळे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी मुद्दा उपस्थित करत पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांची तक्रार केली. या तक्रारीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी हरकत घेतली.
विधानसभेतही शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवेदन केले. विधानपरिषदेतील चर्चेनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करत घोषणाबाजी केली. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री, आमदार सभागृहातून निघून गेले. नंतरच्या तासात शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.