Prithviraj Patil, Shivendraraje Bhosale
Prithviraj Patil, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीची संयोजकांकडून उपेक्षा; पण, शिवेंद्रराजेंनी जाहीर केले पाच लाख..

Umesh Bambare-Patil

सातारा : महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या २१ वर्षीय पृथ्वीराज पाटील यांना स्पर्धा आयोजित केलेल्या संयोजकांकडून एक रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत स्वतः पृथ्वीराजने व्यक्त केली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योग समुहाचे प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा-जावलीकरांच्यावतीने पाच लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.

या संदर्भात बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्‍यात आयोजित करण्यात आली होती. खरं तर राजधानी सातार्‍यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हवं होतं. मात्र, तसे घडले नाही, याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. या व्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराजने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्‍याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे, असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे.

जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले, असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना पाच लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT