पश्चिम महाराष्ट्र

Mahavitaran PRO Suspended : सोशल मीडियावरील व्हिडिओ महागात; खुलासा न केल्याने महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Mahavitaran PR officer suspension news : सोशल मीडियावरील व्हिडिओ संदर्भातील आवश्यक माहितीचा खुलासा न केल्याने महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Rahul Gadkar

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणविरोधात व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका वृत्ताबाबत वेळेत अधिकृत खुलासा देण्यास विलंब केल्याने महावितरण प्रशासनाने अधिकाऱ्याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांना निलंबित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश मुंबई येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातून जारी करण्यात आले.

भोसले यांच्याकडे कोल्हापूर परिमंडलासह कोकण परिमंडलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा प्रभारी कार्यभारही होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणविरोधात व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना उशिरा दिली होती. शिवाय त्यासंदर्भात अधिकृत खुलासा करण्यात विलंब झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ स्तरावर निलंबन करण्याचा निर्णय झाला. निलंबनाचे आदेश भोसले यांना प्राप्त झाले आहेत.

भोसले यांच्याकडे दोन परिमंडळांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने जनसंपर्क व्यवस्थापनावर ताण वाढल्याची चर्चा आहे. मात्र, संवेदनशील प्रकरणांमध्ये तत्काळ प्रतिसाद देणे अपेक्षित असताना त्यात झालेल्या विलंबामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ही प्राथमिक प्रशासकीय कारवाई असून याप्रकरणी विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. चौकशीत संबंधित घटनेचा घटनाक्रम, विलंबाची कारणे, जबाबदारी आणि त्याचे परिणाम यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे समजते. चौकशी अहवालानंतर पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या कारवाईमुळे महावितरणच्या जनसंपर्क यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि विविध संदेश झपाट्याने प्रसारित होत असल्याने चुकीच्या माहितीचे तातडीने खंडन करणे आणि अधिकृत भूमिका वेळेत मांडणे, हे सार्वजनिक संस्थांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT