Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : वाळू तस्करांची पाठराखण केल्याची विखे पाटलांनी दिली कबुली; म्हणाले, "मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की..."

Radhakrishna Vikhe Patil Statement on Sand Mafia: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोणत्याही योजनेत दोन ते पाच टक्के भ्रष्टाचार होतोच, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची पाठराखण करणारं वक्तव्य केलं आहे.

Jagdish Patil

Solapur News, 22 Jan : महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कोणत्याही योजनेत दोन ते पाच टक्के भ्रष्टाचार होतोच, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची पाठराखण करणारं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सोलापूरातील एका कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांकडे दुर्लक्ष करा ते आपलेच लोकं आहेत असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांच्या आशीर्वादानेच सर्व अवैध धंदे सुरू आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या वक्तव्यामुळे आता विखे पाटील आणि भाजपला (BJP) विरोधक घेरण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

टेंभुर्णी येथील एका सिनेमा हॉलच्या उद्घाटनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आले होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह माजी आमदार बबनराव शिंदे, राम सातपुते आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले, "सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, वाळू, खडी क्रशरच्या गाड्या पकडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सतत ऐकावं लागायचं. पण सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपणाला माहितीच आहे. वाळूचे ट्रक, खडी क्रशरच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जरी असले तरी, शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होतं दुर्लक्ष करा, गाड्या चालू राहुद्या, काय फरक पडत नाही सगळे आपलेच लोकं आहेत."

असं म्हणत त्यांनी थेट आपण वाळू तस्करांची पाठराखण केल्याची कबुली दिली. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी पाठराखण केल्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि क्रशर माफियांचा हैदोस सुरू आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, राज्यातील एका बड्या मंत्र्याच्या अशा वक्तव्यामुळे वाळू आणि क्रशर माफियांची हिंमत आणखी वाढू शकते, असे बोलले जात आहे.

तर विखे पाटलांच्या वक्तव्यावर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी देखील स्मित हास्य केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आपल्या वक्तव्याची जाणीव होताच आणि त्याचे भावी पडसाद काय उमटतील हे लक्षात येताच कार्यक्रमानंतर विखे पाटील यांनी आपण हे गंमतीने बोललो असल्याची सारवासारव केली आहे.

कृषीमंत्री नेमकं काय म्हणाले?

एक रुपयांत पीकविमा या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं हळूहळू उघडकीस येत आहे. त्यामुळे पीक विम्याची ही योजना बंद होणार का? असा प्रश्न राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला असता ते म्हणाले, "एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पण कोणत्याही योजनेत दोन-पाच टक्के भ्रष्टाचार होतोच.", असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT