Manoj Jarange Patil Rally Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Rally : जरांगे पाटील नगर जिल्ह्यात अन् मराठा-ओबीसी आरक्षणाचे धुमशान; पोलिसांची दमछाक...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : " मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या तिसऱ्या टप्प्यात राज्यामध्ये विविध ठिकाणी सभा मेळावे, रॅली घेत आहेत. या अनुषंगाने जरांगे पाटील आज 22 नोव्हेंबर आणि उद्या 23 नोव्हेंबर रोजी नगर जिल्ह्यात येत असून, त्यांच्या जवळपास सहा ठिकाणी सभा-मेळावे पार पडणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी या कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आलेले आहे. त्याबरोबरच जरांगे पाटलांच्या सभा मेळाव्यांना होणारी संभाव्य प्रचंड गर्दी पाहता जिल्हा पोलिस दल सतर्क झाले असून, ठिकठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. (Latest Marathi News)

जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर प्रकाशझोतात आलेले मनोज जरांगे पाटील सध्या तिसऱ्या टप्प्यात राज्याचा दौरा करत आहेत. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, 23 नोव्हेंबर रोजी तिसऱ्या टप्प्याचा शेवट होणार आहे. या दरम्यान जरांगे पाटील आज 22 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.

नगर जिल्ह्यातील त्यांचा दौरा शेनीत या दुर्गम आदिवासी गावापासून सुरू होणार आहे. त्यानंतर ते विश्रामगड, पट्टा किल्ला या ठिकाणी भेट देऊन या भूमीचे दर्शन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पट्टा किल्ल्यावर काही काळ विश्राम केला होता. त्यामुळे या ठिकाणाला विश्रामगड असे बोलले जाते. म्हणून या ठिकाणी जरांगे पाटील येणार आहेत. त्यानंतर अकोले या ठिकाणी जरांगे पाटील यांची भव्य अशी सभा होणार आहे. या सभेचे आयोजन मोठ्या जोरदार पद्धतीने करण्यात आहे.

जरांगे पाटील यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात चौंडी येथे धनगर आंदोलनास भेट दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीला पाठिंबा देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात धनगर समाजाने सहभागी व्हावं, असं आवाहनही केलं होते. यामुळे एकूणच अनुसूचित जमातीमध्ये असलेला आदिवासी समाज जरांगे पाटलांवर काहीसा नाराज आहे.

याचीच प्रचिती जरांगे पाटील आदिवासीबहुल अकोले तालुक्यात आज येत असताना होत आहे. आदिवासी समाजाच्या काही नागरिकांनी अकोले तहसीलदार यांना निवेदन देऊन जरांगे पाटलांना अकोल्यामध्ये प्रवेश देऊ नये, असे निवेदन दिल्याची माहिती आहे. मात्र, यावर दोन्ही बाजूने सामंजस्याने तोडगा निघाल्याची माहिती मिळत आहे.

अकोला येथील सभेनंतर आजच जरांगे पाटील संगमनेर येथे सभा घेणार आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात होणारी ही सभा भव्य अशी होईल, राजा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पटांगणात जागा अपुरी पडेल असं बोलले जाते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या ठिकाणी भेट देऊन जागेची पाहणी करत, योग्य तो बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संगमनेर येथील सभेनंतर सायंकाळी श्रीरामपूर शहरांमध्ये सभेचे आयोजन करण्यात आलेला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT