Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Mumbai Morcha : मदरशातील मुक्कामानंतर जरांगे आरतीसाठी थेट श्रीराम मंदिरात

Manoj Jarange Patil Protest Mumbai Bhingar Ahmednagar Shriram Mandir : जरांगेंनी केली प्रभू श्रीरामाची आरती...

Pradeep Pendhare

Manoj Jarange-Patil Ahmednagar News :

मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची नगरमधील मुक्कामी पदयात्रा ऐक्याचे प्रतीक ठरली. बाराबाभळी (ता. नगर) मदरशातील रात्रीच्या मुक्कामानंतर मनोज जरांगे यांनी आज सकाळी भिंगारमधील श्रीराम मंदिरात हजेरी लावत आरती केली. मराठा समाजाला आरक्षण मिळताच अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबईला अंतिम लढाईला चालले आहेत. नगरमध्ये बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिआ मोहम्मदिया मदरसा येथे रात्री मुक्काम केल्यानंतर आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पदयात्रेला प्रारंभ केला.

रस्त्याने त्यांच्या या पदयात्रेत हजारो लोक सहभागी होत होते. पदयात्रेत यामुळे उत्साह होता. पाथर्डी रस्त्याने ही पदयात्रा भिंगार शहरात दाखल झाली. यावेळी भिंगार शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीराम मंदिरात आरतीचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी पदयात्रेच्या मार्गात बदल झाला.

अयोध्येत प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यानिमित्ताने देशभर उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या आरतीचे नियोजन भिंगारमधील सकल मराठा समाजाने केले. भिंगार शहरातील घासगल्लीतील पुरातन श्रीराम मंदिरात मनोज जरांगे यांना नेण्याची तयारी करण्यात आली. भिंगारवेशीपासून ते मंदिरात पाचशे मीटर अंतरावर आतमध्ये होते. पोलिसांनी पदयात्रेचा मार्ग निश्चित केला होता. त्यामुळे भिंगारवेशीतदेखील बॅरिकेड्स टाकण्यात आले होते.

मंदिराकडे जाणारा हा रस्ता असल्याने हे बॅरिकेड्स काढण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक निरीक्षक योगेश राजगुरू यांनी मार्ग बदलणार, म्हणून बंदोबस्त वाढवला. पदयात्रेच्या मार्गात अचानक बदल झाल्याने पोलिसांवर ताण आला. यानंतर मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्याभोवती साखळी करीत मंदिरापर्यंत नेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भिंगारमधील श्रीराम मंदिर हे पुरातन आहे. तिथे अभिषेक आणि होमहवन सुरू होते. मनोज जरांगे यात सहभागी झाले. मनोभावे त्यांनी धार्मिक विधी केला. आरतीची वेळ दुपारी बारा वाजताची होती. या वेळेसाठी मनोज जरांगे हे मंदिरात बसून राहिले. यावेळी त्यांनी भिंगारमधील मराठा समाजासह मंदिरात आलेल्या रामभक्तांशी संवाद साधला. आरतीची वेळ होताच, त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी श्रीरामचा एकच गजर झाला. मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

मनोज जरांगे यांचा रात्रीचा मुक्काम मुस्लिम समाजाची धर्मशास्त्र असलेल्या मदरसा जामिआ मोहम्मदियामध्ये झाला. सकाळी पदयात्रेत सहभागी होताच त्यांनी प्रभू श्रीराम मंदिरात हजेरी लावत आरती केली. मनोज जरांगे यांच्या या पदयात्रेतून ऐक्याचा संदेश दिला गेला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची ही लढाई अंतिम आहे. यात प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने बळ मिळाले आहे आणि त्याला यश नक्कीच येणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळताच आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

edited by Sachin Fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT