Mumbai Market Committee Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Market Committee News: बाजार समित्या कोर्टाची पायरी चढणार...

Anil Kadam

Sangli News : राज्यातील बाजार समितींच्या प्रस्तावित सुधारित कायद्याविरोधात सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच रत्नागिरी जिल्ह्यांतील बाजार समित्यांचे पदाधिकारी एकत्रित आले आहेत. राज्य सरकारने केलेल्या या सुधारित कायद्याला कडाडून विरोध करीत प्रसंगी कोर्टात जाण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या वतीने घेण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक सांगलीत सभापती सुजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये नवीन सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, या मुख्य हेतूने बाजार समिती स्थापन झाली. मात्र, नवीन कायद्यामुळे हा हेतू निष्फळ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे व्यवस्थापन मंडळ हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असणे आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर बाजार समितीचे सदस्य अ‍ॅड. प्रकाश देसाई म्हणाले, प्रत्येक बाजार समितीच्या अडीअडचणी, मुद्दे वेगवेगळे आहेत. नवीन सुधारणांमध्ये सभापती, उपसभापती, संचालक मंडळ शेतकरी प्रतिनिधीकडून लोकशाही मार्गाने निवडून येणे आवश्यक आहे. विविध बाजार समितीच्या प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेऊन या कायद्याला कडाडून विरोध केला. बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे नियमनात आणावे, अन्यथा बाजार समित्या आर्थिक डबघाईस येतील. यामुळे छोट्या व्यापार्‍यांचा व्यापार बद पडून मोठ्या भांडवलदार व्यापार्‍यांची एकाधिकारशाही निर्माण होईल. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.

शेतकर्‍यांची फसवणूक झाली तर न्याय कोणाकडे मागावा हासुद्धा शेतकर्‍यांच्या पुढे प्रश्न उद्भवणार आहे. या कायद्यामुळे लोकनियुक्त संचालक न येता शासनाने नेमलेले प्रतिनिधी येणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा कोणताही सहभाग त्यामध्ये असणार नाही. या कायद्यामुळे व्यापारी, अडते, हमाल यांच्यापुढेसुद्धा अडचणी येणार आहेत. याबाबत सरकार दरबारी निवेदने व हरकती नोंदविण्याबाबत ठरले. तसेच यापुढे राज्यात मोठ्या प्रमाणात बाजार आवारातील सर्व घटकांना घेऊन आंदोलन करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT