Raju shetti
Raju shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी तासाभरात घेणार मोठा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आज (ता. ५ एप्रिल) कोल्हापुरात बैठक होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने स्वाभिमानीमध्ये खदखद आहे. तसेच, सहयोगी पक्षाकडूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुरेशी साथ मिळत नसल्याने राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली आहे. पदाधिकाऱ्यांनीही राजू शेट्टी यांच्यासमोर अन्यायाचा पाढा वाचवून दाखवला होता, त्यामुळे कोल्हापूरच्या बैठकीत शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात की आघाडीत राहूनच संषर्घ करण्याची भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Meeting of State Executive of Swabhimani Shetkari Sanghatana in Kolhapur)

केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणातील फायदे व तोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वाभिमानी पक्षाची राजकीय भूमिका याबाबत राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीत सामील होऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झालेली आहे. त्यामुळेच आज सकाळी शिरोळ येथील पक्षाच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे होणाऱ्या पक्षात तसा निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत देणे, शेतीचा वीजपुरवठा, कोल्हापूरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारने दिलेले नकार अशा काही गोष्टींवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. सत्ता असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील, कशाला महाआघाडीत राहायचे असा सवाल स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळेच सत्तेतून बाहेर पडण्याबाबतची आक्रमक भूमिका राजू शेट्टी वगळता पदाधिकारी मांडत आहे. तत्पूर्वी शेट्टी यांनी आज सकाळी शिरोळ येथील आपल्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे, त्यामुळे सत्तेत राहणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. सत्तेच्या बाहेर पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला सळो की पळो करून सोडण्याची भावाना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पवारांचे आश्वासन आणि स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांची भावना

दरम्यान, कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजू शेट्टी यांची नाराजी दूर करण्यात येईल, असे रविवारीच सांगितले होते. त्यानंतरही पदाधिकारी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मानकिसतेत आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी भाजपकडे जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. पण, भाजपशी संगत नको, अशी भावनाही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काहींनी त्या त्या वेळी निर्णय घेण्याचे सूचविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT