Lata Mangeshkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील साड्या, बांगड्या, अन् ते चुरमुरे दीदी कधीच विसरल्या नाहीत!

कोल्हापुरात लतादीदी यांची खरेदीची हौस पूर्ण करणारी काही हमखास ठिकाणे होती.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. अनेक मान्यवरांची त्यांच्या आठवणी सांगितल्या. लतादीदींची (Lata Mangeshkar) कर्मभूमी मुंबई असली तरी त्यांचे लहानपण कोल्हापूर (Kolhapur) परिसरात गेले. पन्हाळ्यातील त्यांचा बंगला, जयप्रभा स्टुडिओ येथे त्यांच्या अनेक आठवणी आहेत. लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे. लतादीदींच्या अनेक पत्रांचा संग्रह श्रीकांत डिग्रजकर यांच्याकडे आहे.

कोल्हापुरातील पोरे ब्रदर्स, इंगळे साडी हाऊस, हुपरी ऑर्नामेंट, माहेर बॅगल्स, गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुरे अशा अनेक आठवणी लतादीदींच्या कोल्हापुरात आहेत. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून अजूनही हे पार्सल मागवून घ्यायच्या.आजही ही ठिकाणे कोल्हापुरात आहेत. त्यांच्या पुढच्या पिढ्या हे व्यवसाय सांभाळत आहेत. लतादीदींची कोल्हापुरातील ही खरेदीची आवडती ठिकाणे असल्याचा त्यांनाही खूप आनंद व अभिमान आहे.

लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी दिलेल्या उजाळा..

सिनेमातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी जरी लतादीदींची कर्मभूमी मुंबई असली तरी त्याचे लहानपण कोल्हापूर परिसरात गेले. जयप्रभा स्टुडिओ व पन्हाळ्यातील बंगला, यामुळे त्यांचे बहुतांशी वास्तव्य कोल्हापुरातच गेले. त्यामुळे गाण्याचे काम नसेल तेव्हा त्यांचा मुक्काम कोल्हापुरातच असायचा. त्यासाडी, दागिने, खाण्याचे पदार्थ कोल्हापुरातच खरेदी करायच्या. कोल्हापुरात लतादीदी यांची खरेदीची हौस पूर्ण करणारी काही हमखास ठिकाणे होती.

वर्षातून दोन साड्या

लतादीदी जशा कोल्हापुरात आल्या तेव्हापासून त्या साडीच नेसायच्या. विशेषत: पांढराशुभ्र, दुधी, क्रिम हे रंग त्यांच्या आवडीचे होते. कोल्हापुरातील पोरे ब्रदर्स यांच्या साडी दुकानातच लतादीदींची साडीखरेदी व्हायची. त्याकाळात वर्षातून दोन साड्या त्या घ्यायच्या. पुढे संगीतक्षेत्रात गायिका म्हणून स्थिरावल्यानंतरही साडी खरेदीसाठी त्यांचा मोर्चा कोल्हापुरातच वळायचा. पोरे ब्रदर्सनंतर स्टेशनरोडवरील इंगळे साडी हाऊस हे देखील त्यांच्या साडीखरेदीचे केंद्र बनले. सुती, सिल्क, अंबर पॉलिस्टर यासोबत कॉटन चंदेरी, इंदोरी या प्रकारातील साड्या त्यांना आवडत. तर चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दीदी गुजरीतील भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंट या पेढीवर जात असत. भोजे म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या पत्नी बकुळा म्हणजे माई पेंढारकर यांचे भाचे.

पूजासाहित्याची खरेदी

कोल्हापुरात जयप्रभा मुक्कामात लतादीदींसाठी माईंकडूनच जेवणाचा डबा यायचा. लतादीदींच्या त्या बकुळामावशी. मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या. बकुळामावशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी लतादीदींचा खास स्नेह असल्याने दीदी दागिन्यांसह चांदीच्या समई, आरतीचे तबक, निरंजने अशा पूजासाहित्याची खरेदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंटमधूनच करीत असत.

गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुरे

बांगड्या घालण्याचीही दीदींना खूप आवड होती. अंबाबाई मंदिरात जवळील माहेर बॅगल्समधून बांगड्या भरल्याशिवाय दीदी कधीच कोल्हापूर सोडायच्या नाहीत.. माहेर बॅगल्स या दुकानात साठच्या दशकातील दीदींचे बांगड्या भरतानाचे फोटो आजही त्या क्षणांच्या आठवणीची साक्ष देतात. तिथूनच पुढच्या चौकातील दुकानांच्या ओळीतलं दुसरंच दुकान म्हणजे दगडू बाळा भोसलेंल्या यांनी बनवलेल्या पेढय़ांचे. अंबाबाईचे दर्शन झाले की लतादीदींना याच दुकानातील पेढे घ्यायच्या. लहानपणी जेव्हा पोटात भूकेची आग पेटायची आणि खायला काहीच नसायचे तेव्हा मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटीच्या शिंगोशी मार्केटच्या कोपर्‍यावर असलेल्या गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुर्‍यांनी मंगेशकर भावंडाची भूक भागवली आहे.. त्या चुरमुर्‍यांना दीदी कधीच विसरल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT