Crime
Crime Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कर्जतमध्ये आढळला जलयुक्त शिवारमधील गैरव्यवहार : तीन अधिकाऱ्यांना अटक

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - राज्यात प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) हे जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान महायुती सरकारच्या काळातील मोठी उपलब्धी सांगण्यात येत होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर याच जलयुक्त शिवार अभियानात गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. तसेच या अभियानातील कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ( Misconduct in water-rich Shivar found in Ram Shinde's Karjat: Three officers arrested )

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 2015- 2016 मध्ये करण्यात आलेल्या कोंभळी व चांदे खुर्द (ता. कर्जत, जि.नगर) येथील दोन कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने आज (शुक्रवारी) वन विभागातील तत्कालीन पाच अधिकारी, कर्मचारयावर सात गुन्हे दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. या कारवाईने जलयुक्त शिवार अभियानाची कामे करणाऱ्या यंत्रणात खळबळ उडाली आहे. गैरव्यवहार उघड झालेले काम माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या मतदार संघातील आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील, बलभीम गांगर्डे, वनसंरक्षक शेखर पाटोळे यांचा समावेश आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. सत्ता बदलानंतर जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्या सरकारने झालेल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल दिल्यानंतर काही कामाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होती. त्यानुसार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंभळी व चांदेखुर्द येथे केलेल्या खोल सलग समतल चराच्या कामाची लाचलुचपत विभागाच्या पथकाने 4 सप्टेबर 2021 पासून खुली चौकशी केली.

या चौकशीत कोंभळी येथील कामात संगनमताने खोटे दस्त ऐवज तयार करून 9320 रुपयांचा तर चांदे खुर्द येथील 58 हजार 248 रूपयाचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंभळी येथील कामाबाबत वन विभागातील व सध्या सेवानिवृत्त असलेले तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) रमेश गोलेकर, सध्या बल्लारशहा (जि. चंद्रपूर) येथे कार्यरत असलेले व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील, तत्कालीन वनपाल शेखर रमेश पाटोळे तर चांदेखुर्द येथील कामातील गैरव्यवहारबाबत तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) रमेश गोलेकर, सध्या बल्लारशहा (जि. चंद्रपूर) येथे कार्यरत असलेले व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर पाटील, वनपाल पल्लवी सुरेश जगताप, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे अशा दोन्ही कामातील गैरव्यवहारप्रकरणी पाच लोकांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे, विजय ठाकूर, संतोश शिंदे, विजय गुंगल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरूण शेख व राहुल डोळसे यांच्या पथकाने शंकर पाटील, बलभीम गांगर्डे, शेखर पाटोळे तिघांना अटक केली. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने सोमवापर्यंत (ता. 13) पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये कृषी, वन विभाग, जलसंपदा, जलसंधारण व इतर विभागामार्फत 2015 ते 2019 या कालावधीत हजारो कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवारची कामे केली. कृषी विभागाने केलेली कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याची फारशी दखल त्यावेळी कृषी विभागाने घेतली नाही. आता मात्र जलयुक्त शिवार अभियानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कारवाई झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे करणाऱ्या आणि खास करून तक्रारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT