Ranjit Singh Shinde
Ranjit Singh Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार बबनराव शिंदेंचे चिरंजीव अडचणीत; कर्जप्रकरणाच्या फेरचौकशीचे कोर्टाचे आदेश

प्रशांत काळे

बार्शी (जि. सोलापूर) : शेतकऱ्याच्या नावावर परस्पर काढलेल्या कर्जासंदर्भात माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार बबनराव शिंदे (baban shinde) यांचे सुपुत्र तथा बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आणि बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची फेरचौकशी करण्यात यावी, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी गुरुवारी (ता. १७ फेब्रुवारी) बार्शी पोलिसांना दिले आहेत. (MLA Babanrao Shinde's son in trouble; Court orders re-examination of loan case)

बार्शी न्यायालयाने या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात २० एप्रिल २०२१ रोजी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक श्यामराव गव्हाणे यांनी तपास करुन न्यायालयात अहवाल सादर केला होता. तपास अधिकारी गव्हाणे यांनी संशयित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही. ‘क’ फायनल रिपोर्ट दाखल केला होता, या रिपोर्टला शेतकरी पांडुरंग थोरबोले (रा. काळेगाव ता. बार्शी) यांनी ऍड. आर. यू. वैद्य यांच्या वतीने न्यायालयात फेरतपासाची मागणी केली होती. तपास अधिकाऱ्याने संशयित आरोपींना सहकार्य करुन त्यांच्या बाजूने रिपोर्ट दाखल केला आहे, अशी तक्रार न्यायालयात करण्यात आली होती. या तक्रारीची दखल न्यायालयाने घेऊन पोलिसांना फेरतपासणीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज साखर कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिदे यांनी बँकेच्या शाखाधिकाऱ्यांशी संगनमत करुन शेतकऱ्याच्या नावावर परस्पर दोन लाखांचे कर्ज उचलले होते. या प्रकरणी शिंदे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बार्शीचे न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी ९ एप्रिल रोजी बार्शी शहर पोलिसांना दिले होते.

महात्मा गांधी विद्यालय चोरढे (ता. मुरुड जि. रायगड) येथे शिक्षक असणारे पांडुरंग थोरबोले यांची काळेगाव येथे जमीन गट क्रमांक २८४/१ असून त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखा पानगाव येथे जमीन गहाण-तारण ठेवून कर्ज काढले होते. बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचे सभासद होताना कारखान्यास आधार कार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति देण्यात आल्या होत्या. या कागदपत्रांचा फायदा घेऊन रणजितसिंह शिंदे, शाखाधिकारी व एक व्यक्ती समक्ष उभा करुन त्यांनी संगनमत करुन पूर्वीचे माझे नावावर कर्ज असतानाही बँक ऑफ इंडियाच्या, बार्शी शाखेतून माझ्या परस्पर माझ्या बनावट सह्या करून २८ डिसेंबर २०१६ रोजी २ लाख कर्ज माझे नावावर घेतले होते. बँक ऑफ इंडियाचे ॲड. श्रेयस मुळे यांची व्याजासह कर्ज वसुलीसाठी ५ सप्टेंबर २०१९ रोजी २ लाख ५६ हजार १८७ रुपये ७४ पैसे भरण्याची नोटीस आली, तेव्हा परस्पर माझ्या नावावर कर्ज काढल्याचे समजले.

याबाबत बँकेच्या बार्शी शाखेत माहिती घेऊन पोलिस अक्षीक्षक, उपअधीक्क्षक, पोलिस निरीक्षक यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केली. पण, दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला, असे थोरबोले यांनी फिर्यादीत म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT