Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'देशात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वात मोठा विश्वासघात करण्यात आला!'

सरकारनामा ब्यूरो

टेंभुर्णी : राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीला बहुमताने निवडून दिले होते. मात्र, जनतेने दिलेल्या मतांच्या पाठीत खंजीर खपसून बारामतीच्या नेतृत्वाखाली विश्वासघाताने सरकार जन्माला आले. ता. २८ नोव्हे २०१९ रोजी देशातील सर्वांत मोठा विश्वासघात केला गेला, असा घाणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. (MLA Gopichand Padalkar criticizes Mahavikas Aghadi government)

जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानाचा सांगता समारोपाची सभा टेंभुर्णी येथे झाली. त्यात आमदार पडळकर बोलत होते. ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना बसविण्यात आले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री होत आहे, त्यामुळे राज्यातील काही लोकांना आनंद झाला होता. चांद्यापासून बांद्यापर्यंत काही तरी परिवर्तन होईल, अशा भावना लोकांच्या मनात होत्या. पण, त्या भावनांचा अवघ्या एका महिन्यात चक्काचूर झाला आणि महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा उच्चांक केला.

अजित पवारांनी सांगितले होते की आमचे सरकार बसविल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही. मोफत विजेचाही निर्णय या सरकारने असाचा फिरवला आहे. शेजारच्या राज्यात मोफत वीज मिळत असताना महाराष्ट्रासाख्या श्रीमंत राज्याला ते का जमत नाही. महाविकास आघाडीने शेतकरी, गरिबांच्या घरावर नांगर फिरवला. ती प्रवृत्ती मुळासकट नांगरण्याची धमक फडणवीस यांच्याकडे आहे. राज्यातील कुप्रवृत्ती नांगरुन टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नांगर देऊन सत्कार करण्यात आला आहे, असे पडळकर म्हणाले.

ते म्हणाले की, ज्यांनी वेळेत कर्जफेड केली आहे, त्यांना ५० हजार अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. तो आदेश घेऊन आम्ही बॅंकेतील अधिकाऱ्यांना भेटलो, तेव्हा १०० पैकी ३ ते ४ शेतकरी बसतील, अशा जाचक अटी घातल्या आहेत.फडणवीसांनी आवाज उठविल्यानंतर वीज कनेक्शन तोडणीची मोहिम थांबवली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेतकरी सन्मान निधी योजना आणली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर सहा हजार रुपये जमा होतात. शेतकऱ्याच्या जिवावार सर्वांच्या चुली पेटतात. म्हणूनच भाजपकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

...तर पडळकर, खोत, सातपुते आमदार झाले नसते

उजनी धरणाच्या जवळ असलेल्या गावात पाणी मिळत नाही. पण, पवारांच्या नेतृत्वाखाली उजनीतून पाणी पळविण्याचे काम केले जात आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फडणवीस यांनी घालवावे, असे आवाहनही पडळकर यांनी केले. भाजप जातीयवादी असता तर शंभर घरांच्या पडळकरवाडीतील गोपीचंद पडळकर हे आमदार झाले नसते. सदाभाऊ खोत मंत्री झाले नसते, राम सातपुते माळशिरसचे आमदार झाले नसते. सदाभाऊ खोतांनी सर्वत्र फिरून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. ते फडणवीस सोडवतील, असे विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT