Deepak Deshmukh, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंची कोल्हेकुई म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा... दीपक देशमुख

बोगस प्रमाणपत्रे Bogus certificates देऊन विद्यार्थ्यांचे students प्रवेश केल्याचा आणि दिल्ली बोर्ड Delhi Board नसल्याचा बेछुट व बिनबुडाचा आरोप करणाऱ्या आमदार गोरेंनी Jaykumar Gore आजही त्या बोर्डच्या वेबसाईटला जाऊन पाहावे.

संजय जगताप

मायणी : मायणी मेडिकल कॉलेजच्या संबंधाने डॉ. एम. आर. देशमुख आणि परिवारावर केलेली, बेछूट आणि बिनबुडाच्या आरोपांची कोल्हेकुई म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. अनेक भानगडी करून कोणत्याही परिस्थितीत कॉलेज गिळंकृत करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. मात्र, शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तो यशस्वी होऊ देणार नाही. दम असेल तर गोरेंनी आमदारकी व भाजपाची कमंडलू बाजूला सारून सामना करावा, असे प्रतिआव्हान मायणी मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपकराव देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले.

आमदार गोरे यांनी नुकतीच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेज व देशमुख कंपनीवर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्या आरोपांचे पुराव्यानिशी खंडण करीत आज देशमुख यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला. केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि भाजपाकडून सहानुभूती व पाठबळ मिळविण्यासाठीच, आपल्यावर गुन्हे दाखल करण्यामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र असल्याचा आरोप गोरे करीत असल्याचे स्पष्ट करून देशमुख म्हणाले, आम्ही स्वबळावर लढत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांकडे गेलो नाही.

मात्र, रामराजे नाईक निंबाळकर यांना नाहक या वादात ओढून घेत आहेत. कॉलेज फुकटात लाटण्याची दिवास्वप्ने बघणाऱ्या आमदार गोरेंना डॉ. एम. आर.देशमुख (आबा) यांनी कधीही बोलावणे धाडले नाही. एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते आबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कॉलेजवर आले. त्यावेळी चर्चा करताना गोरेंनी मदत करण्याची ग्वाही दिली. २०१२ ते २०१७ अखेर एमबीबीएसला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आम्ही काही देणे आहोत. ते मान्य.

मात्र, ती सर्व देणी तीन महिन्यात भागविण्याचा लेखी करारनामा खुद्द गोरेंच्या सहिनिशीच झाला आहे. तरीही अद्याप एक पैसा त्यांनी कोणाला परत केला नाही. विद्यार्थ्यांच्या देण्यासंबंधाने १३८ चे ३४ गुन्हे दाखल असताना १७० गुन्ह्यांचा जावईशोध गोरेंनी कुठून लावला हे त्यांनाच माहिती. कॉलेजच्या स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन ४०-४५ कोटी होईल, असा दावा करणाऱ्या गोरेंनी याच मालमत्तेवर मुंबई बँकेकडे ७६ कोटी तर स्टेट बँकेकडे ६० कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव कसा काय सादर केला.

त्यांच्याच कारकिर्दीत कॉलेजचे मूल्यांकन ३१२ कोटी कसे काय झाले. याचा खुलासा त्यांनी करावा. कॉलेजने कोणत्याही बोगस विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नसून प्रवेश नियंत्रण समिती ही शासनाच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची असते. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच विद्यार्थी प्रवेशास पात्र असल्याची यादी कॉलेजला पाठवण्यात येते. त्या पात्र विद्यार्थ्यांना बोगस ठरविण्याचा अधिकार गोरे यांना कोणी दिला.

बोगस प्रमाणपत्रे देऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश केल्याचा आणि दिल्ली बोर्ड नसल्याचा बेछुट व बिनबुडाचा आरोप करणाऱ्या आमदार गोरेंनी आजही त्या बोर्डच्या वेबसाईटला जाऊन पाहावे. तेथे त्यांना संबंधित विद्यार्थ्यांची गुणपत्रके पाहायला मिळतील. प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेश निश्चित करून, विद्यापीठाने त्यांच्या परीक्षा घेऊन पास झालेले विद्यार्थी आज वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांना बोगस डॉक्टर म्हणणे बालिशपणाचे आणि हास्यास्पद असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात त्यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेवर दबाव टाकून सुरू केलेल्या कोरोना सेंटरसाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला. सरकारी डॉक्टर, कर्मचारी व सुमारे ८६ लाखांची औषधे सिव्हिल हॉस्पिटल कडून मोफत पुरविण्यात आली. मात्र रुग्णांना मोफत उपचार केले नाहीत. उलट महात्मा फुले जन आरोग्य योजनेची बोगस बिले तयार करून सुमारे साडेतीन कोटी रुपये शासनाकडून त्यांनी ओरबाडले. त्याशिवाय रुग्णांकडूनही हजारो रुपयांची बिले वसूल केली.

संस्थेची मालमत्ता असलेले जमिनीचे गट नंबर ७६६ व ७६७ तसेच गट नंबर ६०६, ७७३, ७७४, ७६६अ, ७६७अ या सर्वांचे बिगर शेतीचे आदेश प्राप्त असताना संस्थेची जमीन एन. ए. नसल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांनी केला आहे. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपकरणे व मशिनरी उपलब्ध नाहीत म्हणणाऱ्या गोरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी हॉस्पिटलचा करार केला.

त्यामध्ये सर्व मशनरी असल्याचे कसे काय नमूद केले, याचा खुलासा करावा. त्यांनी केवळ दमदाटीची व दडपशाहीची भाषा करू नये. त्यांना आम्ही भीक घालणार नाही. त्यांनी ४० गुन्हे दाखल केले तर आम्ही ४१ गुन्हे दाखल करू. तेवढे पुरावे आम्ही गोळा केले असून ते योग्य वेळी ते बाहेर काढू. यावेळी संचालक गणेश भिसे, संदीप देशमुख, हिम्मत देशमुख उपस्थित होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT