MLA Jaykumar Gore News
MLA Jaykumar Gore News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंचे स्टार चमकणार; माण तालुक्याला लाल दिवा मिळणार

सरकारनामा ब्यूरो

गोंदवले : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे चर्चेला उधाण आले असतानाच माणचे आमदार जयकुमार गोरेंनी (Jaykumar Gore) केलेल्या सूचक विधानामुळे लवकरच माणला लवकरच लाल दिवा मिळणार अशा चर्चा झाडू लागल्या आहेत. भाजप (BJP) व मित्रपक्षांची सत्ता आल्यास आमदार गोरे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश असेल, असा विश्वास कार्यकर्त्यांसह जनसामान्यांतून व्यक्त होतोय. (MLA Jaykumar Gore Latest Marathi News)

विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरेंनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. २००९ मध्ये अपक्ष, २०१४ मध्ये काँग्रेस तर २०१९ च्या निवडणुकीत भाजप मधून विजयी होऊन गोरेंनी यशाची हॅट्ट्रिक साधली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करून राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सध्या शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड करून आपला वेगळा गट तयार केला आहे. तब्बल चाळीसहून अधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करत शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर सत्ता स्थापन करावी, अशी या बंडखोर आमदार गटाची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर माणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेंनी खाजगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देऊन सत्तांतराची गणिते जुळून भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे सूतोवाच केलेय. फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही गोरेंनी व्यक्त केला आहे.

राज्यात भाजप व मित्रपक्षांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले तर माणचे आमदार गोरे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे. आपल्या आमदारकीच्या काळात माणच्या पाणीप्रश्नासह एमआयडीसी व इतर समस्यांबाबत आमदार गोरेंनी विधानसभेत आवाज उठविला आहे. माण खटाव मतदार संघातील समस्या सोडविताना आक्रमक भूमिका घेत असल्याने आमदार गोरेंनी राज्यात आपला पगडा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपचा राज्यातील राजकीय शत्रू मनाला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी गोरेंना मंत्रिपद देऊन जिल्ह्यातील ताकद वाढविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो, असाही आखाडा बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर माणला लवकरच लाला दिवा मिळणार अशी चर्चा जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गोरेंच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT