Man Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Jayakumar Gore: येत्‍या तीन वर्षांत दुष्‍काळाचा कलंक पुसणार

MLA Jayakumar Gore: सिद्धेश्‍‍वर कुरोली येथील सभेत प्रभाकर घार्गेंवर टीकास्त्र

सरकारनामा ब्यूरो

MLA Jayakumar Gore: गेल्या १५ वर्षांत जनतेला शब्द दिल्याप्रमाणे उरमोडी, तारळी, जिहे कठापूरचे पाणी माण- खटावमध्ये आणले आहे. वंचित गावांसाठीच्या ७५० कोटींच्या टेंभू योजनेची कामे सुरू झाली आहेत.

जिहे- कठापूरची वाढीव आंधळी उपसा योजना पूर्णत्वाला निघाली आहे. औंधसह २१ गावांची योजना राज्यपालांकडे मंजुरीला पाठवली आहे. त्‍यामुळे येणाऱ्या तीन वर्षांनंतर माझ्या मतदारसंघाला दुष्काळी म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही, असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

दरम्‍यान, मतदारसंघातील १८७ गावांमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांचे माझे बोर्ड एकही विकासकाम न करणाऱ्या प्रभाकर घार्गेंना चपराक ठरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सिद्धेश्‍‍वर कुरोली (ता. खटाव) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला, भगिनी उपस्थित होत्या.

श्री. गोरे म्हणाले, ‘‘माझ्या तीन ओळींच्या जाहीरनाम्यात माण- खटावचे भाग्य बदलण्याची क्षमता होती ते सध्या दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात कॅनॉलचे पाणी वाहत आहे. उसाची बागायती शेती होत आहे. कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आता जगाशी स्पर्धा करायला सज्ज होताना महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी राहात आहे.

शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने आम्ही पाऊल टाकत आहोत. मी १५ वर्षांत रात्रंदिवस परिश्रम करून माझ्या मायबाप जनतेची इमानेइतबारे सेवा केली. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सांगितलेली सर्व कामे मार्गी लावली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करून त्यांना व्यसनांपासून दूर ठेवले. मी अहंकारी नाही तर स्वाभिमानी आहे.

कामाच्या जोरावर सन्मानाने मला निवडणुकीचे तिकीट मिळाले. विरोधकांसारखे मला दोन महिने लाचार बनून बारामतीकरांचे तळवे चाटावे लागले नाहीत. मी माझ्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी प्राणपणाने पाण्यासाठीची लढाई लढलोय.’’

श्री. गोरे पुढे म्हणाले, ‘‘माझ्याविरोधी आमचं ठरलंय टीममधील सर्व जण विकले गेले आहेत. व्यवहार फिसकटल्याने ते एकमेकांच्या अंगावर धावून जात तमाशा करत आहेत. प्रभाकर देशमुखांना पराभव दिसल्यानेच त्यांनी अंग काढून घेतले.

ज्यांचे आयुष्य तडजोडीत गेले, त्‍या प्रभाकर घार्गेंनी एखाद्या गावात केलेले विकासकाम किंवा त्यांचा राजकीय पक्ष कोणता ते सांगावे. त्यांना विधान परिषद, जिल्हा बॅंकेसाठी बिनविरोध निवडून देण्यासाठी मदत केली. तुरुंगात असतानाही मदत केली. बाजार समितीच्‍या निवडणुकीत सहकार्य केले. मात्र, त्यांनी आणि त्यांच्या टीमने बारामतीची दुकानदारी सुरू ठेवली आहे.’’

कार्यक्रमात औंध गटातील अनेक विरोधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

घार्गेंमुळेच औंधची योजना रखडली

सध्या सुरू असलेली लढाई जयकुमार किंवा घार्गेंची नाही. व्यक्तिगत कुणाच्या नावापुरती, अस्मितेची नाही. ही लढाई मतदारसंघाच्या दुष्काळमुक्तीची आहे. माण- खटावच्या अस्मितेची आहे. घार्गे कधीच पाणी चळवळीत दिसले नाहीत.

अकरा वर्षांपूर्वी औंध पाणी योजनेसाठी झालेले उपोषण श्रेयवादातून सोडवल्यानंतर ते कधीच प्रयत्नशील दिसले नाहीत. त्यांच्यामुळेच या योजनेला उशीर झाला असला, तरी औंधसह २१ गावांना आम्हीच पाणी देणार असल्याचा विश्वास आमदार गोरेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT