Man Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Jayakumar Gore: हवेत तीर मारण्‍यापेक्षा समोरासमोर चर्चेला या

MLA Jayakumar Gore: खटाव तालुक्‍यात महायुतीचे उमेदवार म्‍हणून विविध गावांत संवादफेरी

सरकारनामा ब्यूरो

MLA Jayakumar Gore: मी गेली १५ वर्षे माण- खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि इथल्या जनतेची इमाने इतबारे सेवा करत आहे. येथील मायबाप जनता नेहमीच मला आशीर्वाद देत आली आहे.

मी कधीच दहशत आणि गुंडगिरी केली नाही. कारखान्यावर हजारो टन उसाची काटामारी करून राजरोसपणे शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्यांनी माझ्या दहशतीची भाषा करू नये. मी केलेल्या पाणी योजनांच्या प्रत्येक कामांची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. उगाच हवेत तीर मारण्यापेक्षा प्रभाकर घार्गेंनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले.

खटाव तालुक्यातील विविध गावांच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘‘मी माण- खटावच्या दुष्काळमुक्तीचे उद्दिष्ट ठेवून चार टप्प्यांत विभागणी केली.

आमदारकीच्या पहिल्या तीन कार्यकाळात उरमोडी, तारळी, जिहे-कठापूरचे पाणी आणले. माणच्या उत्तर भागाला पाणी दिले. आता चौथा टप्पा माझे व्हीजन आहे. त्यात दोन्ही तालुक्यांतील ५२ गावांसाठीच्या टेंभू योजनेला ७५० कोटींचा निधी आणि अडीच टीएमसी पाणी मिळवून कामे सुरू केली आहेत.

माणमधील उर्वरित गावांचा जिहे-कठापूर योजनेत समावेश करून त्यासाठी सव्वा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. घार्गेंमुळे रखडलेल्या औंधसह वीस गावांची पाणी योजना राज्यपालांकडे मान्यतेला पाठवली आहे. मी गेल्या १५ वर्षांत पाणी योजनांची केलेली कामे, मिळवलेला हजारो कोटींचा निधी कागदावर आहे.’’

शरद पवारांनी आमच्या पाणीयोजना रखडवण्याचेच काम केले. दुष्काळमुक्तीची लढाई वेळेत पूर्ण करून आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी मतदारसंघात औद्योगिकरणाची बीजे रोवली आहेत.

म्हसवड येथील एमआयडीसीचा प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत समावेश करून महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी राहात आहे. त्यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्‍या अद्ययावत शिक्षणासाठी शैक्षणिक क्रांती करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. दळणवळणाची क्रांती तसेच जलक्रांती झाल्यावर आता औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती आम्ही हाती घेतली असल्याचेही श्री. गोरे यांनी सांगितले.

फलटण, बारामतीकरांमुळे योजना रखडल्या

माण- खटावच्या पाणी योजना बारामतीच्या पवारांनी आणि फलटणच्या रामराजेंनीच रखडवल्या. पाणीच नाही तर द्यायचे कुठून? असे शरद पवार म्हणायचे, तर पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार नाही, असे रामराजे म्हणायचे. जयंत पाटलांनी जिहे-कठापूरच्या वाढीव आंधळी योजनेचे टेंडर रखडवले होते. त्यामुळे घार्गेंनी नाकर्त्या नेत्यांची तळी उचलू नये. मी मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्ती अंतिम टप्प्यात आणली असल्‍याचे श्री. गोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT