Sangli Municipal Elections : Jayant Patil, uddhav thackeray And harshwardhan sapkal sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : जयंत पाटलांच्या मतदारसंघातूनच महाविकास आघाडीला सुरुंग : एका घोषणेने राजकारण ढवळून निघणार!

Sangli Municipal Elections : आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर सांगलीतही राज्याप्रमाणेच आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या गळाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते लावत असतानाच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जयंत पाटलांनी जबरदस्त खेळी खेळली आहे.

Rahul Gadkar

  1. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे.

  2. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.

  3. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये या घोषणेबद्दल नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.

Sangli News : धर्मवीर पाटील

आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणाच आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे. या घोषणेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीत आघाडी घेतली असली तरीही महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राज्यस्तरावर घटकपक्षांची एकत्रित महाविकास आघाडी या स्थानिक निवडणुकीत एकत्र राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक स्तरावर कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्था आहे. त्यामुळे 'आम्ही तुम्हाला जमेतच धरत नाही' असा थेट मेसेज त्यांना द्यायचा आहे का? असा सवाल उपस्थित झाला असून घटकपक्षांत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मातोश्रीवर जात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला जम्यात धरत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

राज्याच्या राजकारणात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी स्थिती आहे. जयंत पाटील या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षाला महत्त्वाचे स्थान दिले जाताना दिसत नाही. राष्ट्रीय काँग्रेस आणि आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अलीकडे वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये असलेला वाद वरिष्ठांपर्यंत पोचला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना उबाठा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, पुरोगामी समविचारी संघटना या सर्व संघटनांनी एकत्र येऊन महायुतीला तोड देण्याचा इतिहास आहे. पण यावेळी मात्र प्राथमिक स्तरावर अशी कोणतीही चर्चाच झालेली नाही. आमदार जयंत पाटील यांनी सुरुवातीलाच 'एकला चलो रे' अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

जिल्हा स्तरावर मात्र खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्यासोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. असे असताना स्थानिक पातळीवर मात्र त्यांनी ही चाल अशी का खेळली याबाबत अन्य घटक पक्षांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यानी इतर घटकांशी चर्चा करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

दुसरीकडे महायुती किंवा शहर विकास आघाडी यांच्यात मात्र संबंधित घटक पक्ष एकत्र येऊन चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रभागनिहाय चर्चा आणि उमेदवार ठरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच इतर वेळी घाई न करणाऱ्या आमदार जयंत पाटील यांनी मात्र यावेळी आपला उमेदवार घोषित करून निवडणूक रिंगणात आघाडी घेतली आहे.

हे करत असताना त्यांनी समविचारी पक्षांना विश्वासात न घेतल्याने या आघाडीच्या समन्वयाबाबाबत शंका उपस्थित होत आहे. जयंत पाटील यांना कट्टर विरोध करणारा काँग्रेस मधील एक गट काही केल्या त्यांच्यासोबत जाणार नसला तरी ज्यांचे विरोधकांशी जुळुच शकत नाही अशांना त्यांनी गृहीत धरणे अपेक्षित होते.

आमदार जयंत पाटील आपणाला विश्वासात घेणार नसतील तर काही कार्यकर्ते तिसरा पर्याय विचारात घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विचार झाल्यास सत्ताधारी आणि विरोधकांना दोघांनाही काही प्रमाणात याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आमदार पाटील याबाबत कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

FAQs :

1. जयंत पाटील यांनी कोणता निर्णय घेतला?
जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे.

2. हा निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतला गेला?
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

3. या घोषणेमुळे कोणते पक्ष नाराज झाले आहेत?
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

4. महाविकास आघाडीत तणावाचे कारण काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसने इतर आघाडीतील पक्षांचा सल्ला न घेता उमेदवार जाहीर केल्याने तणाव वाढला आहे.

5. या घोषणेमुळे पुढे काय परिणाम होऊ शकतात?
महाविकास आघाडीत समन्वय तुटण्याची शक्यता वाढली असून, स्थानिक निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT