Jaykumar Gore, Shekhar Gore, Manoj Pol
Jaykumar Gore, Shekhar Gore, Manoj Pol sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार जयकुमार गोरेंचा धक्का कोणाला; माणच्या निकालाकडे लक्ष

रूपेश कदम

दहिवडी : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघ लक्षवेधी ठरला असून आमदार जयकुमार गोरे यांनी बंधू शेखर गोरे की राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना पाठिंबा दिला, याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली आहे. या मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले.

विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीत माघार घेतल्यानंतर माण सोसायटी मतदारसंघात अचानक ट्विस्ट निर्माण झाला होता. आमदारांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीचे मनोज पोळ व शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यात सरळ सामना रंगला होता. दोघांनीही आपल्या परीने प्रचार केला होता. त्यातही शेखर गोरे यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवली होती. तरीसुध्दा विजयी होण्याइतपत संख्याबळ मिळविण्यात दोघेही यशस्वी ठरले नव्हते.

त्यामुळे आमदार जयकुमार गोरे व बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले अनिल देसाई यांच्या मतांवर या दोघांचीही भिस्त आहे. विशेषत: आमदार गोरे काय करणार, यावर विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार, हे ठरणार आहे. येथील महात्मा गांधी विद्यालयात जिल्हा बँक निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. एकूण ७४ मतदारांपैकी सर्व ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या दिवशी आज सकाळच्या सत्रात साधारण २० मतदारांनी मतदान केले होते. त्यात बहुतांश राष्ट्रवादी समर्थक होते.

त्यानंतर शेखर गोरे यांच्या मतदारांनी दोन आराम बसमधून येऊन एक गठ्ठा मतदान केले. त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा होती, ती आमदार जयकुमार गोरे व त्यांचे समर्थक मतदार हे दुपारी साडेतीनपर्यंत मतदान केंद्राकडे फिरकले नव्हते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास आमदार गोरे हे समर्थक मतदारांना घेऊन केंद्रावर आले. या सर्वांनी रांगेत जावून मतदान केले.

दरम्यान, मतदान केंद्रावर शेखर गोरे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यात नियमांच्या कारणावरून किरकोळ शाब्दिक चकमक झाली. पण, काही वेळातच त्यावर पडदा पडला. मतदान झाल्यानंतर मतदार तसेच नेतेमंडळी, समर्थक हे येथील फलटण चौकातील हॉटेलमध्ये एकत्र येऊन हास्यविनोदात दंग झाले होते. त्यामुळे तणाव जावून वातावरण हलकेफुलके राहण्यास मदत होत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT