Jayant Patil ON Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha 2024: जयंतरावांनी विखेंना डिवचले, नगर दक्षिणेत आता आयात उमेदवाराची गरज नाही...

Jayant Patil ON Sujay Vikhe Patil: नगर दक्षिणेत समरस होईल, असा नेता दिला आहे. कोणत्याही यंत्रणेचे ओझे नसलेला आमचा उमेदवार आहे. मीटिंगमध्ये असल्याचे उत्तर सर्वसामान्यांना मिळणार नाही.

Pradeep Pendhare

Nagar: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेला अस्सल शुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Pawar Group) आगामी वाटचाल शतप्रतिशत विजयी असणार आहे. नगर दक्षिणेत नीलेश लंके (Nilesh Lanke)हा विजयी उमेदवार दिला आहे. त्यामुळे आयात केलेल्या उमेदवाराची गरज नाही. शरदचंद्र पवार पक्षात येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असून, ती आगामी काळात दिसेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.

नीलेश लंके यांचा जनसंवाद दौरा नगर दक्षिणेत पाथर्डीतील श्री क्षेत्र मोहटा देवी येथून सुरू झाला आहे. या वेळी पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील यांनी खासदार विखेंविरोधात केलेल्या सचूक विधानांची या वेळी चर्चा होती. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले, माजी आमदार साहेबराव दरेकर, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे उपस्थित होते.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले, "नगर दक्षिणेत समरस होईल, असा नेता दिला आहे. कोणत्याही यंत्रणेचे ओझे नसलेला आमचा उमेदवार आहे. मीटिंगमध्ये असल्याचे उत्तर सर्वसामान्यांना मिळणार नाही. २४ तास उपलब्ध असलेला नीलेश लंकेंचा नगर दक्षिणेत निश्चित विजय आहे". नीलेश लंकेंची उमेदवारी जाहीर होताच गावा-गावात उत्साहाचे वातावरण आहे.

शेतकरी अडचणीत आहे. बेरोजगारी वाढली. शेतीसाठी पाणी नाही. अशा अनेक समस्या नगर दक्षिणेत आहे. या समस्यांवर उत्तम तोडगा काढण्यासाठी नीलेश लंकेंना उमेदवारी दिली आहे. शून्यातून विश्वनिर्मिती करू इच्छिणारा. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे आणि त्यांच्या सेवेत दुजाभाव नसतो, असेही जयंत पाटील म्हणाले. "येत्या 16 दिवसांत ते मतदारसंघातील किमान 50 टक्के गावांतून जातील. नवे व स्वच्छ आणि तळागाळात काम करणारे नेतृत्व असल्याने गावा-गावांतून गेल्यावर व त्यांचे उत्स्फूर्त स्वागत नक्कीच होईल," असा विश्वासदेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मतविभाजनासाठी भाजपकडून प्रयत्न

आमदार परतीच्या वाटेवर आहेत. शरद पवारांकडे येणार आहेत. जागावाटपाला उशीर होत असला, तरी सर्वांची बाजू समजून घेऊन एकमत करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, मतविभाजन हे भाजपच्या फायद्याचे ठरावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. वंचितबरोबर आघाडीशी आम्ही चर्चा केलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पण खेद आहे की, त्यांचे जमेनासे दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

आमच्या सर्वेक्षणात यश

नीलेश लंके सर्व समाजाचे प्रतिनिधी आहेत. जातपात-धर्म अशी कोणतीही आडकाठी त्यांना नाही. बारा बलुतेदारही त्यांचे समर्थन करत आहेत. सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊन त्यांना मत देण्यास ते इच्छुक आहेत. आमच्या सर्वेक्षणात नीलेश लंकेच नगर दक्षिणेतून विजयी होणार, असे वातावरण आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT